चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून महिला आणि तिच्या सहकाऱ्यांची ३५ लाख २४ हजार २५० रुपयांची फसवणूक करण्यात आली. रक्कम परत मागितल्यानंतर शिवीगाळ आणि धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी स्टेला संतोष तायडे, संतोष अंकुश तायडे, जॉय संतोष तायडे आणि एंजेल संतोष तायडे (सर्व रा. गुलमोहर सोसायटी, लेन क्रमांक एक, बकोरी फाटा, वाघोली) यांच्यावर लक्ष्मीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मनीषा ज्ञानेश्वर शिर्के (वय ४५, रा. जयप्रकाशनगर, ५०९ चौक, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
ट्रस्टला देणगी मिळवून देण्याच्या बहाण्याने १ कोटी ९७ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२४ ते जुलै २०२५ या कालावधीत राजीव गांधी रुग्णालय, पर्णकुटी चौक, येरवडा येथे हा प्रकार घडला. आरोपींनी शिर्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा विश्वास संपादन केला. गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आश्वासन देऊन त्यांना पैसे गुंतविण्यास भाग पाडले. त्यानुसार शिर्के आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकूण ३५ लाख २४ हजार २५० रुपये दिले. मात्र, आरोपींनी परतावा अथवा मूळ रक्कम दिली नाही. पैसे मागितल्यानंतर शिवीगाळ करून रक्कम परत न देण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
एसटी बसमध्ये चढताना ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी चोरीला
स्वारगेट एसटी स्थानकात बसमध्ये चढणाऱ्या ७७ वर्षीय महिलेच्या गळ्यातील वीस ग्रॅम वजनाची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. सोनसाखळीची किंमत वीस हजार रुपये आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कमल डॅनियल डोंगरे (वय ७७, रा. सर्व्हे क्रमांक २९, डिझायर बिल्डिंगसमोर, घोरपडी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता डोंगरे या स्वारगेट स्थानकातील सोलापूर एसटी स्टँडसमोर पुणे-सोलापूर बसमध्ये चढत होत्या. गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली.






















