गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरण, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार, महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांचा आरोप
Marathinews24.com
पुणे – गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्यावर वेळेत उपचार न केल्याने त्यांचा मृत्यू झाला. भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्मालयात जबाबदार असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सोमवारी स्पष्ट केले.
भिसे यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली. या समितीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवला. या समितीने सादर केलेला अहवाल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर केला. यावेळी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील उपस्थित होत्या.
चाकणकर म्हणाल्या, ‘मंगेशकर रुग्णालयााने भिसे यांच्यावर उपचार करण्यास विलंब केला. वेळेत उपचार न मिळाल्याने तनिषा यांचा मृत्यू झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर रुग्णालयाने अनेक गोपनीय गोष्टी सार्वजनिकरित्या मांडल्या. भिसे आणि त्यांचे नातेवाईक २८ मार्चला नऊ वाजता रूग्णालयात गेले. तेव्हा त्यांच्याकडे १० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. दुपारी अडीचच्या सुमारास त्या रुग्णालयातून बाहेर पडल्या. पाच तास त्यांच्यावर कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत. वेळेत उपचार न केल्याने रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला. वेळेत पैसे न भरल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले नाहीत.’
भिसे या गर्भवती होत्या. माता मृत्यू प्रकरणी अहवाल राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सादर होईल.त्यानंतर आणखी एक अहवाल धर्मादाय विभागाकडून मंगळवारी सादर करण्यात येईल. हे दोन्ही अहवाल मिळाल्याशिवाय पुढील कारवाई करता येणार नाही. योग्य उपचार न मिळाल्याने भिसे यांचा मृत्यू झाल्याचे शासनाने स्थापन केलेल्या पाच सदस्यीय समितीच्या अहवालात म्हटले आहे. रुग्णलयाने कोणतीही नियमावली पाळली नाही. या अहवालांची पाहणी केल्यानंतर रुग्णालयाविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे, असे चाकणकर यांनी नमूद केले.
पोलिसांकडून ससूनच्या अधिक्षकांना पत्र
गर्भवती तनिषा भिसे या साडेपाच तास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात थांबून होत्या. त्यांच्यावर उपचार करण्यात आले नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. दरम्यान, पोलिसांकडून ससून रूग्णालयाच्या अधिक्षकांना पत्र देण्यात येणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर अहवाल पोलिसांना सादर करावा, असे पत्रात म्हटले आहे. ससूनकडून हे पत्र मिळाल्यानंतर पुढील कारवाई करणे शक्य होणार आहे.