पोलीस आयुक्तांचे शस्त्र परवान्याबाबत कडक निकष
marathinews24.com
पुणे – शस्त्र परवाना मंजूर करण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक निकष निश्चित केले आहेत. गेल्या दीड वर्षात शस्त्र परवान्यासाठी आलेले अर्ज ४०४ अर्ज फेटाळण्यात आले आहेत, तसेच १०४ जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी नव्याने फक्त २८ जणांना शस्त्र परवाने मंजूर केले असून, त्यामध्ये १० वारसा हक्क आणि नऊ शस्त्र परवाने क्रीडापटूंच्या कोट्यातून मंजूर करण्यात आले आहेत.
सिंधुताईंच्या आश्रमातील मुली लग्नासाठी देतो असं सांगून केली फसवणूक – सविस्तर बातमी
शहर पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शस्त्र परवान्यासाठी कडक निकष, नियमावली जाहीर केले. १ जानेवारी २०२४ ते ३ जून २०२५ या कालावधीत पुणे पोलिसांकडे शस्त्र परवाना मिळवण्यासाठी ५७२ अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी २८ जणांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित अर्ज नामंजूर करण्यात आले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ४९ जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. शस्त्र परवाना नुतनीकरणासाठी सादर करण्यात आलेले ९७ जणांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत.
काही जणांना शस्त्र परवान्याबाबत नोटीसही बजाविण्यात आली आहे. शस्त्र परवान्यासाठी अनेक अर्जदारांनी स्वसंरक्षणासाठी परवाना हवा आहे, असे कारण दिले आहे. यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी समाजात भीती निर्माण करण्यासाठी शस्त्र परवाना देणार नाही. परवान्यासाठी ठोस आणि जबाबदार कारण द्यावे लागेल, असे स्पष्ट केले आहे.
निलेश चव्हाणचा शस्त्र परवाना गृह मंत्रालयाकडून
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी नीलेश चव्हाण याचा शस्त्र परवाना पुणे पोलिसांनी आधी नाकारला होता. मात्र, त्याने गृह विभागाकडून त्यासाठी परवानगी मिळवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्थानिक पोलिसांनी त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती त्यावेळी दडवली होती. चव्हाण याने शस्त्र परवाना मिळवण्यासाठी राजकीय ताकद वापरली, असे सूत्रांनी सांगितले.
चव्हाण याच्याविरुद्ध यापूर्वी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली होती. पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यानंतर चव्हाण याने गृहमंत्रालयात अपील केले होते.