‘सृजनयात्री’ : नवनिर्मितीचा नवोन्मेष
marathinews24.com
पुणे – किराणा, मेवाती आणि ग्वाल्हेर घराण्याचा सुश्राव्य मिलाफ साधत नवनिर्मित बंदिशींचा आनंद रसिकांना अनुभवता आला. निमित्त होते ‘सृजनयात्री’ कार्यक्रमाचे. सुप्रसिद्ध संवादिनी वादक सुयोग कुंडलकर, मेवाती घराण्याचे सुप्रसिद्ध गायक आणि बंदिशकार सचिन नेवपुरकर यांनी प्रचलित आणि अप्रचलित रागातील सुमधुर आणि सुरेल बंदिशी रचल्या आहेत. या बंदिशींचे सादरीकरण किराणा घराण्याच्या गायिका आणि प्रभा अत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या विदुषी आरती ठाकूर-कुंडलकर आणि सचिन नेवपुरकर यांनी सुश्राव्य आणि प्रभावीपणे केले. बंदिशींचा रसिकांनी भरभरून आनंद घेतला.
रंगमंच विटाळू नका; प्रसंगी नाटकाचा शस्त्रासारखा वापर करा- नाना पाटेकर – सविस्तर बातमी
कार्यक्रमाचे आयोजन टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारातील गणेश सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सुयोग कुंडलकर यांनी रचलेल्या राग सांझमधील रूपक तालातील ‘ए री भयी सांज सखी री’ या बंदिशीने झाली. याला जोडून द्रुत तीन तालातील ‘अब तो मोरी मान ले ओ सावरिया’ ही रचना सादर करून आरती ठाकूर-कुंडलकर यांनी तराणा सादर केला. यानंतर सचिन नेवपुरकर रचित राग रागेश्रीमधील झपतालातील ‘आली रि जियरा’ ही माधुर्यपूर्ण बंदिश सादर केली. सुयोग कुंडलकर यांनी रचलेल्या गोरख, सोहोनी, रसवंती, यमन या रागांवर आधारित ‘अब तुमी सो लगन ला’, ‘जी न जाओ रे बलवमा’, ‘मानत नाही करत बरजोरी’, ‘झनन झनन बाजे पैंजन सखी’ या बंदिशींचे आरती ठाकूर-कुंडलकर यांनी सुमधुर सादरीकरण केले.
राग रागेश्री, मारुबिहाग, सोहोनी, यमन, दिन की पूरिया या रागांवर आधारित सचिन नेवपुरकर यांनी रचलेल्या बंदिशींचे त्यांनीच प्रभावीपणे सादरीकरण केले. सोहोनी या एकच रागाकडे वेगळेपणाने बघण्याचा दोन बंदिशकारांचा दृष्टिकोन दर्शविताना सचिन नेवपुरकर यांनी गुरुविषयी कृतज्ञता दर्शविणारी, आग्रा घराण्याची शैली दर्शविणारी ‘पार करन दे हो नैय्या’ ही बंदिश रसिकांना विशेष भावली. सोहोनी रागतच रचलेल्या सुयोग कुंडलकर यांची ‘जी न जाओ रे बलवमा’, ‘काहे समझत नाही मोरा मनवा’ ही बंदिश सादर करताना आरती ठाकूर-कुंडलकर यांनी आपल्या गायनातून विरहिणीची व्यथा प्रभावीपणे दर्शविली. जन संमोहिनी रागात आडा चौतालमध्ये सुयोग कुंडलकर यांनी रचलेली देवीचे वर्णन करणारी ‘दुर्गे महारानी वरदानी’ ही रचना सादर करून आरती ठाकूर-कुंडलकर यांनी भक्ती-शक्तीचा सुरेल संगम साधला. शब्द आणि स्वरांचे लालित्य सुरेलपणे मांडणाऱ्या सुयोग कुंडलकर रचित ‘शाम को तिलक भाल’ या रागमालेतून सुमारे 21 रागांचे समर्पक दर्शन साधले गेले.
कार्यक्रमाची सांगता सचिन नेवपुरकर यांनी भैरवी रागातील होरीने केली. श्रीकृष्णाचा गोपिकांशी चाललेला खट्याळपणा आणि मग गोपिंनीही काढलेली श्रीकृष्णा छेड, त्यातून लज्जित झालेला श्रीकृष्ण यांचे सुंदर चित्रण उभे करणाऱ्या ‘करत है मनमानी श्याम कन्हाई’ आणि ‘चलो री चलो री सखी पकड कान्ह को’ या रचना नेवपुरकर यांनी सादर करून कृष्ण-गोपिकांच्या अवखळपणाचे दृश्य रसिकांसमोर साकारले. सुयोग कुंडलकर (संवादिनी), ऋषिकेश जगताप (तबला) यांनी समर्पक साथसंगत करत मैफिलीत रंग भरले. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण निवेदन प्रतिमा कुलकर्णी यांनी केले.



















