मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील- उपमुख्यमंत्री अजित पवार
marathinews24.com
पुणे – मागेल त्याला शेततळे योजनेच्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले.
विधानभवन येथे आयोजित जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार राहुल कुल, सुनील शेळके, चेतन तुपे, हिरामण मांडेकर, बाबाजी काळे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, विभागीय कृषि सहसंचालक दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अजित पिसाळ आदी उपस्थित होते.
जिल्ह्याने ॲग्री हॅकॅथॉनचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. ज्याचा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उपयोग होईल. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष त्याचा वापर करण्यास सुरूवात केल्यानंतर त्यांना त्याचे फायदे लक्षात आल्यानंतर अधिक मागणी होईल. ते पाहता विविध पिकांसाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब व्हावा म्हणून अधिकची तरतूद करण्यात येईल, असेही श्री. पवार म्हणाले.
राज्यात पूर्वी मागेल त्याला शेततळे योजनेत ५० हजार रुपये अनुदान दिले जात होते. ते नंतर वाढवून ७५ हजार रुपये केले. आता त्यात वाढ करण्याची मागणी होत असून १ लाख रुपयांपर्यंत कसे वाढविता येईल याबाबत विचारविनिमय करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
बियाणे, किटकनाशकांच्या बाबतीत तक्रारींकडे तात्काळ लक्ष द्यावे. बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशके बाजारात येऊ नये यासाठी कठोर कारवाई करावी, असेही ते म्हणाले. डोंगरी भागात कृषी विभागाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तेथील पदे भरण्याची कार्यवाही करण्यात यावी. कृषी विभागाच्या विविध योजनांच्या लाभाची रक्कम महाडिबीटी मार्फत वेळेत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल यासाठी प्रयत्न करावेत, आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डूडी यांनी प्रास्ताविकात सांगितले, मान्सून वेळेवर येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून त्यानुसार जिल्ह्यात बियाणे आणि खतांच्या पुरेशा उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र सुमारे २ लाख हेक्टर आहे. गेल्या तीन हंगामात सुमारे ३४ हजार क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून यावर्षी ४८ हजार क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. १ लाख ९६ हजार मे. टन रासायनिक खतसाठा मंजूर आहे. त्यानुसार पुरवठ्याबाबत अडचण येणार नाही. युरियाचा ७ हजार ५०० मे. टन आणि डी.ए.पी. चा १ हजार मे. टनचा संरक्षित (बफर) साठा करण्यात येणार आहे.
यावर्षी ॲग्री हॅकॅथॉन हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून यात कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या, स्टार्टअप्स तसेच उद्योग संघटना आदींनी स्पर्धक म्हणून नोंदणी केली आहे. यात कृषी क्षेत्रातील विविध समस्यांचे आठ प्रकारात वर्गीकरण करण्यात आले असून त्यावर स्पर्धकांनी सादर केलेल्या उपाययोजनांची छाननी करुन १ ते ३ जूनदरम्यान हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे. एआय, रोबोटिक्स तंत्रज्ञान, जीआयएस, आयओटी, ड्रोन तंत्रज्ञान, शेतीमध्ये मशीन लर्निंग आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यातून प्रत्येक वर्गीकरणातील प्रथम विजेत्यास २५ लाख रुपये व द्वितीय विजेत्यास १५ लाख रुपये पारितोषिक म्हणून दिले जाईल.
याशिवाय पुढील पाच वर्षात निर्यातक्षम पिकांच्या लागवड तसेच उत्पादन वाढीसाठी समूह अर्थात क्लस्टर पद्धतीने विकास करण्यात येणार आहे. यात केळी, अंजिर, स्ट्रॉबेरी, आंबा, करडई व सूर्यफूल, ज्वारी, भात, भाजीपाला, सोयाबीन यासह ऊस उत्पादकतेत वाढ करणे यावर भर दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
इंद्रायणी भाताला भौगोलिक ओळख (जीआय) मिळावी यासाठी प्रयत्न व्हावेत, अशा आमदार श्री. शेळके यांच्या मागणीच्या अनुषंगाने कृषी विभागाने तात्काळ तसा प्रस्ताव करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या रकमेत वाढ व्हावी, वनविभागाच्या हद्दीतील जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात व्हावीत, अशी मागणी आमदार कुल यांनी केली. त्यावर कार्यवाही निर्देश श्री. पवार यांनी दिले.
प्रारंभी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत डीबीटीद्वारे अनुदान प्राप्त लाभार्थी शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी या योजनेचे अनुदान आजच बँक खात्यावर जमा झाल्याचा लघुसंदेश (एसएमएस) उपमुख्यमंत्री महोदयांना दाखविल आणि समाधान व्यक्त केले.