डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये मानवजातीच्या कल्याणाची ताकद-उपमुख्यमंत्री अजित पवार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वदूर पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन

Marathinews24.com

मुंबई- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचे, विचारांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन त्यांना अभिवादन केले आहे. राज्यातील नागरिकांना डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

डॉ. बाबासाहेबांनी देशातील अज्ञान, अनीती, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेदासारख्या कुप्रथांविरुद्ध निर्णायक लढा दिला. माणसाला माणसाप्रमाणे जगण्याचा हक्क त्यांच्यामुळे मिळाला. समाजातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क, स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं. ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ या त्यांच्या संदेशानं बहुजनांच्या कित्येक पिढ्यांचं कल्याण केल्याचे त्यांनी सांगितले

वाचनाची गोडी लावा, भविष्य घडवा, अजित पवार यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला – सविस्तर बातमी

डॉ. बाबासाहेबांनी देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिले आहे. त्यामुळे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, भौगोलिक विविधतेच्या भारताला एकता, समता, बंधूतेच्या सूत्रात बांधण्यासह देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम ठेवण्याचे केले आहे. गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष असा भेदाभेद न करता प्रत्येक नागरिकाला एका मताचा समान अधिकार दिला. प्रत्येक देशवासियाला मानाने स्वाभिमानाने जगण्याचा हक्क दिला आहे.
डॉ. बाबासाहेब युगपुरुष होते. त्यांचे विचार कुठल्याही एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या कल्याणासाठी नव्हते, अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद त्यांच्या विचारांमध्ये आहे,” असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले आहे.

डॉ. बाबासाहेबांचा मानवकल्याणाचा विचार पुढे घेऊन जाणं, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाचा सर्वांगीण विकास करणे हेच त्यांना अभिवादन ठरेल. देशाच्या राजकारण, समाजकारण, अर्थकारणाला आश्वासक दिशा देण्याचे काम डॉ. बाबासाहेबांनी केलं. त्यांच्यासारखे महामानव देशात जन्मले, त्यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना दिली हे आपलं भाग्य आहे. डॉ. बाबासाहेब कायदेतज्ञ, घटनातज्ञ, अर्थतज्ञ होते. लेखक, पत्रकार, चित्रकार, संगीतकार होते. डॉ. बाबासाहेबांनी केलेला महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृती दहनाचं आंदोलन, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दिलेले लढे, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेतील त्यांची भूमिका; हे सारं देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक सुधारणांच्या चळवळीतील क्रांतिकारी टप्पे आहेत. डॉ. बाबासाहेबांचे मानवकल्याणाचे विचार सर्वदूर पोहोचावेत; त्यातून देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम रहावी. एकता, समता, बंधूतेचा विचार अधिक मजबूत व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top