सीए केतन सैय्या यांची माहिती; ‘आयसीएआय’कडून सीएच्या विद्यार्थ्यांसाठी ५०० कोटींच्या शिष्यवृत्तीची तरतूद
marathinews24.com
पुणे – वाणिज्य विद्याशाखेमध्ये करिअरच्या उत्तम संधी आहेत. पाचवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात वाणिज्य विषयाचा समावेश करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, शिक्षण सचिव आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांची भेट घेतली असून, त्यांनी वाणिज्य विषयाच्या समावेशाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे, अशी माहिती दी इन्स्टिट्यूट आफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे (डब्ल्यूआयआरसी) अध्यक्ष सीए केतन सैय्या यांनी बुधवारी दिली. सीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी तब्बल ५०० कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘डब्ल्यूआयआरसी’च्या उच्चपदस्थ अधिकारी शिष्टमंडळाने बुधवारी पुण्यातील विविध संस्थांना भेटी देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर ‘आयसीएआय’च्या बिबवेवाडी येथील पुणे शाखेत संस्थेच्या वतीने सीए सभासद व विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कौन्सिलचे उपाध्यक्ष सीए पियुष चांडक, सचिव सीए जीनल सावला, खजिनदार सीए फेनील शहा, पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार, विभागीय समितीचे सदस्य सीए अभिषेक धामणे, सीए रेखा धामणकर, सीए राजेश आगरवाल यांच्यासह ‘आयसीएआय’ पुणेचे उपाध्यक्ष सीए प्रणव आपटे, सीए निलेश येवलेकर, खजिनदार सीए नेहा फडके, कार्यकारिणी सदस्य सीए सारिका दिंडोकर, सीए नंदकुमार कदम, सीए प्रितेश मुनोत आदी उपस्थित होते.
सीए केतन सैय्या म्हणाले, “शालेय पाठ्यपुस्तकात वाणिज्य विषयाला समर्पित पाठ समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी ‘आयसीएआय’तर्फे राज्याच्या शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. या मागणीला शिक्षणमंत्र्यांसह संबंधित उच्चपदस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तज्ज्ञ सनदी लेखापालांची समिती करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यामुळे नवीन अभ्यासक्रमात वाणिज्य विषयाचा अभ्यासक्रम समाविष्ट होण्याबाबत स्पष्टता आली आहे.”
सीए करू इच्छिणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी संस्थेने ५०० कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीची तरतूद केली असल्याचे सांगून सीए केतन सैय्या म्हणाले, “ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ५ लाखांच्या आत आहे, अशा विद्यार्थ्यांना कुठल्याही अटी, शर्तींशिवाय शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष व्यावसायिक गरजा, यांच्यात नेमका मेळ घालण्यासाठी विशेष अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने आयोजित केले जातात. सतत बदलणारे तंत्रज्ञान आणि वाढती स्पर्धा, ही दोन प्रमुख आव्हाने सीए व्यावसायिकांसमोर आहेत, मात्र मागणी अधिक पण पुरवठा कमी, अशी परिस्थिती असल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सीए अभ्यासक्रमाची निवड उच्च शिक्षणासाठी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
सीए सचिन मिणियार म्हणाले, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यावसायिक अनुभव मिळावा, यासाठी इंटर्नशिप्स दिल्या जातात. शैक्षणिक संस्थांमधून कॅम्पस सिलेक्शन केले जाते. सीए अभ्यासक्रमांत काळानुरूप योग्य बदल वेळोवेळी केले जातात. सीए अभ्यासक्रम आव्हानात्मक असला, तरी वर्षातून तीन वेळा विद्यार्थ्यांना परीक्षा देता येते. अभ्यासक्रमात बदल करताना, ते व्यवसायाभिमुख आणि विद्यार्थीकेंद्रित असतील, याची काळजी घेतली जाते.” यावेळी ‘डब्ल्यूआयआरसी’च्या पदाधिकाऱ्यांचे पुणेरी पगडी, गणपतीची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले.




















