मंगळसूत्र हिसकावणाऱ्या आरोपीला १२ तासात बेड्या; २ लाख ५० हजारांचा ऐवज, दुचाकी जप्त
marathinews24.com
पुणे – स्विगी डिलिव्हरी बॉय असल्याचा बहाणा करीत रस्त्याने फिरून मॉर्निग वॉक करणार्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावणार्या दुचाकीस्वार चोरट्याला सहकानगर पोलिसांनी १२ तासात अटक केली आहे. त्याच्याकडून दोन तोळ्याचे अडीच लाखांचे दागिने, दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे. अमोल किसन नाकते (वय २७ सध्या रा. समता कॉलनी, आंबेगाव पठार मुळ रा.मु. पिंपरी पोस्ट गुंजवणे ता. वेल्हा जि.पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला २० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना १६ मे रोजी सकाळी सहाच्या सुमारास धनकवडीत घडली होती.
काय सांगता…पुण्यात वर्षभरात साडे सहा हजार मद्यपी चालकांवर कारवाई – सविस्तर बातमी
तक्रारदार महिला १६ मे सकाळी सहाच्या सुमारास मॉर्निंग वॉक करीत होती. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्याने त्यांच्याजवळ येउन गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील पथकासह तपास करीत होते. घटनास्थळाजवळील १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी आरोपी हा स्विगी कंपनीचा डिलवरी बॉय म्हणनु फिरत असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस अंमलदार सागर सुतकर, योगेश ढोले यांना आरोपी हा आंबेगाव पठारनजीक गणेश चौकात थांबल्याची माहिती मिळाली.
तपास पथक घटनास्थळी धाव घेताच आरोपी पळून जाताना त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अमोल किसन नाकते असे नाव सांगितले. सकाळी दुचाकी गाडीवरून आंबेगाव पठारसह धनकवडी भागात स्विगी डिलिव्हरी बॉयचा बहाणा केला. वयस्कर महिला रस्त्याने चालत असताना तिच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसका मारून चोरी केल्याची कबुली दिली. ही कामगिरी अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, बापु खुटवड, सागर सुतकर, योगेश ढोले, प्रदिप रेणुसे, महेश भगत, बजरंग पवार, आकाश किर्तीकर, खंडु शिंदे, अमित पदमाळे, मारोती नलवाड यांनी केली.