लांबोटी (जि. सोलापूर) याठिकाणी पुणे पोलिसांच्या चकमकीत गुंड ठार
marathinews24.com
पुणे – सराईत गुन्हेगार टिपू पठाण टोळीतील गुंड शाहरुख उर्फ हट्टी रहीम शेख हा पुणे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. शाहरुख हा काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये फरार होता. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर त्याने गोळीबार केला. त्यानंतर चकमक झाल्यानंतर रविवारी पहाटे पाचच्या सुमारास मोहोळजवळ लांबोटीत त्याचा एन्काऊंटर करण्यात आला. शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय ३०, रा. गल्ली नं. २३/ए,सय्यदनगर, हडपसर, पुणे) असे ठार केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
लूटमार करणारा सराइत गजाआड – खंडणी विरोधी पथकाची कारवाई – सविस्तर बातमी
त्याच्यावर पुणे शहरातील हडपसर, वानवडी, कोंढवा,काळेपडळ पोलीस ठाण्यांत खून, दरोडा, खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा १५ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यावर ‘मोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे.
शेख हा सराईत गुंड टिपू पठाण याच्या टोळीचा साथीदार होता. त्याच्यावर हडपसर भागातील काळेपडळ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. डिलिव्हरी बॉयला मारहाण करून त्याच्या खिशातील मोबाईल आणि रोकड चोरून नेल्याप्रकरणी नोमान सय्यद (वय २०, रा. हडपसर) आणि शाहरुख शेख याच्यावर हा गुन्हा दाखल केला होता. उमर शकील शेख (वय २१, रा. मोहंमदवाडी) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादी फूड डिलिव्हरी अँपवरून आईस्क्रीमची डिलिव्हरी देण्यासाठी मोटार सायकलवरून जात होते.
त्यावेळी तीनजणांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून फिर्यादीच्या खिशातील मोबाईल आणि ६३० रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते. विरोध केल्यावर त्यांच्यावर कोयत्याने वार केल्यामुळे त्यांच्या कानावर लागला होता. त्यानंतर आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून ज्येष्ठ नागरिकाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी करून दहशत पसरविली होती. ही घटना सय्यदनगर येथे १४ मार्चला मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली होती. काळेपडळ पोलिसांनी याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करून सराईत नोमान सय्यद याला अटक केली होती.
नोमान हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी ६ गुहे दाखल आहेत. शाहरुख ऊर्फ हट्टी पसार झाला होता. तो मार्च महिन्यापासून फरार होता. तो सोलापूर जिल्ह्यातील मोहोळजवळ असलेल्या लांबोटी गावामध्ये नातेवाईकाला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे हे पथकासह मोहोळ घटनास्थळी गेले.
मोहोळ पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी लांबोटी येथे जाऊन शाहरुख याला पकडण्याचा प्रयत्न केला. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शाहरुख याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचा सांगण्यात येत आहे.
रविवारी (दि.१५) पहाटे पाचच्या सुमारास मोहोळ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी ही माहिती सोलापूर जिल्हा नियंत्रण कक्षाला दिली. शाहरुख याला जखमी अवस्थेत सोलापूर जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. शाहरुख याचा मृत्यू झाला. एन्काऊंटरच्या घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीण जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी मोहोळ पोलीस ठाण्यावर दाखल झाले. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी कारवाईनंतर लांबोटी गावात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. त्यासोबतच गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.