बंडगार्डन रस्त्याजवळ टिव्हीएस कंपनीच्या शोरूमला व सर्व्हिस सेंटरला लागली आग
marathinews24.com
पुणे – शहरातील बंडगार्डन रस्त्यावर ताराबाग या तीन मजली इमारतीत तळमजल्यावर टिव्हीएस कंपनीचे शोरूम व सर्व्हिस सेंटरला लागलेल्या आगीत तब्बल ६० दुचाकी जळाल्या आहेत. सोमवारी (दि. २५) राञी ०८ वाजून ३८ मिनिटांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात आगीचा कॉल आला होता. दुचाकींना आग लागल्याची वर्दि मिळताच अग्निशमन दलाकडून नायडू व येरवडा अग्निशमन केंद्रातील वाहन व मुख्यालयातील वॉटर टँकर तातडीने रवाना केला होता.
घटनास्थळी पोहचताच जवानांनी पाहिले की, तीन मजली इमारतीत तळमजल्यावर टिव्हीएस कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली होती. दुचाकी वाहने पेटल्याने प्रचंड धूर निर्माण झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रथम आतमध्ये कोणी अडकल्याची खाञी करताना एकजण धुरामुळे अडकल्याचे समजताच जवानांनी त्याला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर इतरञ पाण्याचा मारा सुरु केला. धूर जास्त प्रमाणात असल्याने श्वसन यंत्र परिधान करीत ३० मिनिटांत आग आटोक्यात आणली. त्यानंतर कुलिंग ऑपरेशन सुरु ठेवले. या घटनेत इलेक्ट्रिक व पेट्रोल अशा ६० दुचाकी जळाल्या असून यामध्ये काही नवीन तसेच दुरुस्ती करिता आलेल्या दुचाकी असल्याचे समजले. घटनास्थळी इलेक्ट्रिक वायरिंग, यंत्र सामुग्री, बॅटरी, वाहनांचे सुटे भाग, संगणक, सोफा, एसी, टेबलखुर्च्या, कागदपञे आगीत जळाली आहेत.
लागलेल्या आगीचे कारण अस्पष्ट
आगीचे नेमके कारण समजले नसून अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी विजय भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आपले कार्य वेळेत पार पाडत पुढील धोका टाळला. यावेळी महावितरण कर्मचारी वर्ग पोलिस उपस्थित होते.























