दगड व धारदार शस्त्राने वाहनांची तोडफोड
marathinews24.com
पुणे – पूर्वीच्या भांडणाच्या रागातून चौघाजणांनी दगड व धारदार शस्त्राने वाहनांची तोडफोड केल्याची घटना सोमवारी (दि. २१ एप्रिल) मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास पाषाण येथील सोमेश्वरवाडीतील संध्यानगरमध्ये घडली आहे. पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केल्याचा प्रकार पळून जाणार्या चौघांपैकी एकाला नागरिकांनी पाठलाग करून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर उर्वरित तिघांची नावेही उघडकीस आली आहेत. या प्रकरणी एका २६ वर्षीय वकिलाने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी तीन अल्पवयीनांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ट्रकच्या धडकेत पुण्यातील तिघांचा मृत्यू – सविस्तर बातमी
तक्रारदार हे वकिल असून, दि. २१ एप्रिलच्या मध्यरात्री घरात झोपले होते. त्यावेळी त्यांना घराबाहेर मोठा आवाज ऐकू आला. त्यांनी खिडकीतून पाहिले असता, त्यांची दुचाकी इतर वाहनांची चौघेजण दगड व हत्यारांनी तोडफोड करत असल्याचे दिसून आले. आवाजामुळे परिसरातील नागरिक बाहेर आले असता, आरोपी पळून जाऊ लागले. यावेळी नागरिकांनी त्यातील एकाला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, तो पाषाण येथील सोमेश्वरवाडी लमान तांडा येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. अधिक चौकशीत, गल्लीतील काही मुलांशी झालेल्या जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही तोडफोड केल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास चतुःश्रृंगी पोलिस करीत आहेत.
कोंढवा बुद्रूकमध्ये झाली होती २२ वाहनांची तोडफोड
नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी वाहनांची तोडफोड करणार्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनीट पाचने नुकतेच अटक केली आहे. टोळक्याने कोंढवा बुद्रूकमधील तब्बल २२ वाहनांची तोडफोड करीत नुकसान केल्याची घटना १६ एप्रिलला पहाटेच्या सुमारास घडली होती. नवाज अजीज शेख (वय २०) अल्फाज मुर्तजा बागवान (वय २० ) यश विजय सारडा (वय १९) अमन कबीर इनामदार (वय २० सर्व रा. इंदिरानगर पॉवर हाऊसचे मागे, गुलटेकडी पुणे) यांना अटक केली आहे. दुचाकीस्वार टोळक्याने १६ एप्रिलला पहाटेच्या सुमारास अश्रफनगर कोंढवा परिसरात दहशत माजवून चारचाकी वाहनांची तोडफोड केली होती. त्याच टोळक्याने लक्ष्मीनगरमध्येही दुचाकी, रिक्षा, मोटारीची तोडफोड करुन दहशत माजवली होती. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडूनही आरोपींचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते.