कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सहाय्यक अधीक्षकावर गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – नामांकित डेव्हलपर कंपनीला जलसंपदा विभागाचे बनावट शासकीय मंजुरी पत्र आणि बनावट जावक क्रमांक टाकून फसवणूक केल्याप्रकरणी कंत्राटदारासह कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सहाय्यक अधीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गौरव देवराव डहाळे आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, सिंचन भवन, मंगळवार पेठ येथील सहायक अधीक्षक अभियंता राजेंद्र विष्णू सावंत या दोघांवर समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत श्रीजीत प्रवीण थोरात (वय ३५, रा. ग्रीन पार्क सोसायटी, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
हडपसर गाडीतळावरील पालखी तळावर चोरट्यांचा सुळसुळाट – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ जानेवारी ते दि. ११ जुलै या कालावधीत सिंचन भवन, मंगळवार पेठ येथे हा बनावट कारभार सुरू होता. ‘मे. एव्हिटा कन्स्ट्रक्शन प्रा. लि. पुणे’ या कंपनीने मौजे दारूंब्रे (ता. मावळ, जि. पुणे) येथील कासारसाई कालव्यावरून कालव्यात स्वखर्चाने पूल बांधण्यासाठी जलसंपदा विभागाकडून परवानगी मिळवण्याचे काम कंत्राटदार गौरव डहाळे याला दिले होते. मात्र, आरोपी गौरव डहाळे आणि राजेंद्र सावंत यांनी आपसात संगनमत करून मंजुरी पत्रावर बनावट जावक क्रमांक टाकला. त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून बनावट दस्तऐवज तयार केला आणि तो खरा असल्याचे भासवून संबंधित कंपनीला देऊन फसवणूक केली.
नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाची २० लाखांची फसवणूक
सरकारी किंवा चांगल्या पगाराची नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून एका बेरोजगाराकडून तब्बल २० लाख रुपये घेऊन कोणतीही नोकरी न देता आर्थिक फसवणूक केल्याची घटना डेक्कन भागात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंढरी रामलू पोगलवार (रा. भाटवडगाव नवीन वसाहत, माजलगाव, जि. बीड) आणि लक्ष्मीकांत मारोतराव जिरेवाड (रा. शिवाजी महाविद्यालय, परभणी) यांच्यावर डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विठ्ठल पांडुरंग भिसे (वय ३०, रा. जैतापूर, ता. जि. नांदेड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ३ फेब्रुवारी २०२४ ते दि. १० जून २०२४ या कालावधीत डेक्कन पी.एम.पी.एम.एल बस स्टँड परिसरातील विविध हॉटेलमध्ये हा व्यवहार झाला. आरोपींनी फिर्यादी विठ्ठल भिसे यांना विश्वासात घेऊन त्यांना नोकरी लावून देतो असे सांगितले. मात्र, कोणतीही नोकरी न देता त्यांच्याकडून वेळोवेळी एकूण २० लाख रुपये उकळले आणि आर्थिक फसवणूक केली.


























