१० महिलांचे साडेतीन लाखांचे दागिने लंपास
marathinews24.com
पुणे – हडपसर गाडीतळ परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात दर्शनासाठी आलेल्या तब्बल १० महिला भाविकांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन पळवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत छबुताई आप्पासो वाडकर (वय ५७, रा. ससाणे नगर, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
लोकमान्यनगरमध्ये ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ जुलै रोजी सकाळी सव्वानऊ ते साडेनऊ वाजताच्या दरम्यान हडपसर गाडीतळ येथे हा प्रकार घडला. फिर्यादी छबुताई आणि इतर ९ महिला भाविक श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी दर्शनाच्या मुख्य रांगेतील गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोराने फिर्यादी व इतर ९ महिलांच्या गळ्यातील एकूण तीन लाख ५६ हजार रुपये किमतीचे ८९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अत्यंत शिताफीने चोरून नेले.
विश्रांतवाडीत दहशत निर्माण करणाऱ्यांना पकडले
विश्रांतवाडी परिसरातील जाधव वस्तीत बेकायदेशीर व घातक लोखंडी हत्यारे घेऊन दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्या ४ तरुणांना पोलिसांनी शस्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये अटक केली आहे. याप्रकरणी वैभव शशिकांत लोंढे (वय २२), कृणाल हिरामण माने (वय १९), अनिकेत संपत वायदंडे (वय २४) आणि दक्ष एकनाथ माने (वय १८) (सर्व रा. शांतीनगर, येरवडा, पुणे) यांच्यावर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार विशाल शाम गाडे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ८ जुलै रोजी रात्री सव्वाआठ ते नऊ वाजताच्या दरम्यान विश्रांतवाडी येथील जाधव वस्तीत ही कारवाई करण्यात आली. आरोपी हे बंदी आदेश लागू असतानाही घातक लोखंडी हत्यारे आणि कोयते हातात घेऊन मोटारसायकलवरून दहशत पसरवत फिरत असताना पोलिसांना आढळून आले.


























