ठिकठिकाणी घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक, साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
Marathinews24.com
पुणे – घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून सोन्याचे दागिने, चार लॅपटाॅप, दुचाकी असा ४ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आयुष संजय खरात ( वय २०, रा. सुखसागर नगर, कात्रज), आर्यन कैलास आगलावे (वय १९, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. १६ मार्च रोजी पहाटे तीनच्या सुमारास कात्रजमधील संतोषनगर परिसरात तिरुपती कॉलनीत राहणाऱ्या रहिवाशाच्या घरात चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा आंबेगाव पोलिसांकडून तपास करण्यात येत होता.
घरफोडीचा गुन्हा खरात आणि आगलावे यांनी केल्याची माहिती पोलीस कर्मचारी हनुमंत मासाळ आणि चेतन गोरे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. आरोपींनी आंबेगाव, भारती विद्यापीठ, मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीचे चार गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, चार लॅपटाॅप, दुचाकी असा ४ लाख ६६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, सहायक निरीक्षक प्रियंका गोरे, उपनिरीक्षक मोहन कळमकर आणि पथकाने ही कामागिरी केली.