८ गुन्हे उघड; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
marathinews24.com
पुणे – शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील महावितरणच्या रोहित्रांची तोडफोड करुन तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टाेळीला गुन्हे शाखेच्या युनिट सातने गजाआड केले. चोरट्यांनी रोहित्राची तोडफोड करुन तांब्याच्या तारा चोरण्याचे आठ गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून १२ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
लावणी नृत्यांगना राधा पाटील हिच्यासह मंडळाच्या अध्यक्षांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी
मोहम्मद साहेबजान मंगेरखान (वय ३०), आदर्श चंद्रप्रकाश पांडे (वय २२), चंद्रसेन शिवरतन धारिया (वय २८, तिघे सध्या रा. गोटेमाळ, सासवड, जि. पुरंदर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. पुणे शहरालगत असलेल्या वाघोली, लोणीकंद परिसरातील महावितरणच्या रोहित्रांची तोडफोड करुन तांब्याच्या तारा चोरून नेण्याच्या घटना घडल्या होत्या. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेच्या युनिट सातकडून तपास करण्यात येत होता.
पुणे-अहिल्यानगर परिसरातील वाडेगावाजवळ रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तारा चोरणाऱ्या टोळीतील चोरटे टेम्पोतून येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विनायक साळवे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना पकडले. तपासात त्यांनी वाडेगाव, आष्टापूर, सांगवी सांडस गाव परिसरातील आठ रोहित्रांची तोडफोड करुन तांब्याच्या तारा चोरल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडून १२ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गु्न्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, गुन्हे शाखेचे उपायुक्त गौहर हसन, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, उपनिरीक्षक राहुल कोळपे, विनायक साळवे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, भरत उर्किडे, अमोल ढोणे, विकास कदम, निर्णय लांडे यांनी ही कारवाई केली.




















