शासकीय सेवा डिजिटल माध्यमातून अधिक सुलभ करा-संचालक संजय काटकर यांचे आवाहन
marathinews24.com
पुणे – शासनाकडून देण्यात येणाऱ्या सेवा नागरिकांना जलदगतीने उपलब्ध करुन नागरिकांचे जीवन अधिक सुखकर बनविण्यासाठी तसेच उपलब्ध असलेल्या ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करून विभागाच्या सेवा ऑनलाईन पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे शासनाचे धोरण आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी केले.
आपले सरकार सेवा केंद्र चालकांना अर्ज भरण्याचे आवाहन – सविस्तर बातमी
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (6 मे) आयोजित जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पुणे सुहास मापारी, हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, पिंपरी चिंचवड तहसीलदार जयराज देशमुख, सर्वसाधारण शाखेचे तहसीलदार श्वेता पवार , नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे, माहिती तंत्रज्ञान कक्षातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
काटकर म्हणाले, आपले सरकार सेवा केंद्र चालकांना नागरिकांना सौजन्याची वागणूक द्यावी. इयत्ता दहावी व बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशाकरीता लागणारे दाखले विहित काल मर्यादेत उपलब्ध करून द्यावे. आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून संकेतस्थळावर कामकाज करतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबतची माहिती घेतली. त्यावर संबंधितांनी उचित कार्यवाही करावी. क्षमता बांधणीसाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना विशेष प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आहे.
नागरिकांना सर्व प्रकारच्या सेवा एकाच एकाच ठिकाणाहून मिळण्याकरीता महानगरपालिकांच्यावतीने देण्यात येणाऱ्या सेवांचासुद्धा समावेश आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्या लॉगिनला करण्यात येईल, असेही श्री. काटकर म्हणाले. मापारी यांनी जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सेवादूत’ उपक्रमाबाबत माहिती दिली. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना अधिकाधिक सेवा विहित कालमर्यादेमध्ये घरपोच देण्याबाबतचे प्रशासनाचे नियोजन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.