खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह शिष्टमंडळाने दाखल केली तक्रार
marathinews24.com
पुणे – पुणे शहरातील गुन्हेगारीत प्रचंड वाढ – राज्यभरात घडलेल्या विविध गुन्ह्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात बुधवारी (दि.९) स्वारगेट पोलीस स्थानकात तक्रारी दाखल करण्यात आली. स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दामिनी मार्शलच्या हिसक्याने कष्टकरी महिलेला मिळाले पैसे – सविस्तर बातमी
अहिल्यानगरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाखाली खोटे शासन निर्णय काढून शासनाची, पर्यायाने सामान्य जनतेच्या पैशांची कोट्यावधींची लूट करण्यात आली आहे. याबाबत अद्यापही कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही, तातडीने ही कारवाई करून गुन्हेगारांना शासन करावे अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासोबतच सत्ताधारी पक्षातील आमदाराने मुंबईत कॅन्टीन चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
ज्यांना जनतेने कायदा बनवण्यासाठी विधिमंडळात पाठवले तेच कायदा पायदळी तुडवत असतील तर ही संविधानाची पायमल्ली आहे. अशा आमदारावर गुन्हा दाखल करावा व कायदेशीर कारवाई करावी अशी ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
महायुती सरकारच्या कार्यकाळात पुणे शहरात कोयता गॅंग, बलात्कार, आर्थिक गुन्हे अशा अनेक वाईट प्रवृत्तींनी धुमाकूळ घातला आहे. विद्येचे माहेरघर म्हणून कधीकाळी ओळखले जाणारे पुणे शहर आजकाल गुन्हेगारीचे माहेरघर म्हणून कुप्रसिद्ध होत आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने ठोस कार्यवाही करावी अशी ही लेखी तक्रार खा. सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्वारगेट पोलीस स्थानकात केली आहे. यावेळी विशाल तांबे, सचिन दोडके, काकासाहेब चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.