छत्रपती मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीच्या संतोष भंडारीवर गुन्हा
Marathinews24.com
पुणे – ठेवींवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून २९ गुंतवणूकदारांची १ कोटी १३ लाख ७४ हजारांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी हडपसरमधील छत्रपती मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीच्या संतोष बसवंत भंडारी (रा. मिलेनियम पार्क, छत्रपती संभाजीनगर) याच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.
विजेंद्र उत्तमराव पाटील (वय ३७, रा. गुरूकृपा सोसायटी, केशवनगर, मुंढवा) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणात फसवणूक, संगनमत करणे तसेच महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमधील आकाशवाणी परिसरात छत्रपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोयटीची शाखा आहे. संतोष बसवंत भंडारी (रा. मिलेनियम पार्क, छत्रपती संभाजीनगर) हा पतसंस्थाचा पदाधिकारी आहे. पतसंस्थेत गुंतवणुकदारांना २०२० ते २०२४ दरम्यान गुंतवणूक केली होती. त्यांना मुदत ठेवींवर चांगल्या प्रकारे व्याज देण्याचे आमिष पतसंस्थेच्यावतीने दाखविण्यात आले होते. यामध्ये २९ जणांना त्यांनी ठेवलेल्या ठेवी परत न मिळाल्याने व त्यांची सर्वांची १ कोटी १३ लाख ७४ हजारांची फसवणूक केली. सध्या याप्रकरणात फसवणूक २९ गुंतवणुकदार असून, तक्रारदार व फसवणुकीच्या किंमतीमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक हसन मुलानी करत आहे.