कोयताधारी टोळक्याकडून लुटमार, वडगाव परिसरातील घटनेने खळबळ
marathinews24.com
पुणे – कोयताधारी टोळक्याने भरदिवसा ज्वेलर्सवर दरोडा टाकून ५ तोळ्याचे दागिने लुटून नेल्याची घटना मंगळवारी (दि. १) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सिंहगड रोडवरील गजानन ज्वेलर्समध्ये घडली आहे. दुचाकीवर आलेल्या शस्त्रधारी चोरट्यांनी ज्वेलर्स मालकासह त्यांच्या पत्नीला धमकावून अवघ्या काही मिनीटांत दागिन्यांची चोरी केली आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, सराफी पेढी संघटनेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कोयताधारी चोरट्यांनी वारकर्यांना लुटून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना ३० जूनला पहाटेच्या सुमारास दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीत घडली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह शहरातील कायदा सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
महाविद्यालयीन तरुणीला त्रास देणाऱ्या रोडरोमिओला बेड्या – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रूकमध्ये शंकर घाडगे यांच्या मालकीचे गजानन ज्वेलर्स असून, संबंधित सराफी पेढीचे मालक घाडगे हे पत्नीसह दुकानात थांबले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघाजणांनी मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास ज्वेलर्समध्ये प्रवेश केला. टोळक्याने त्यांचा चेहरा रूमालाने झाकल्याचे दिसून आले. ज्वेलर्समध्ये शिरताच त्यांनी ज्वेलर्स मालक शंकर घाडगे आणि त्यांची पत्नी मंगल घाडगे यांना धमकावले.
ज्वेलर्सचे शोकेस फोडून ५ चैन आणि १ नेकलेस असे ५ तोळ्यांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी पुन्हा घाडगे दाम्पत्याला धमकावून दुचाकीवरून पसार झाले आहेत. दरोड्यामुळे घाबरलेल्या घाडगे दाम्पत्याने तातडीने आजूबाजूच्या लोकांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. घटनास्थळी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकांनी धाव घेतली.
चोरट्यांनी धबी सीसीटीव्हीत कैद
दुचाकीस्वार शस्त्रधारी चोरट्यांनी छबी सीसीटीव्ही कॅमेर्यात वैâद झाली असून, त्याअनुषंगाने पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह कारागृहातून सुटून आलेल्या गुंडांची झाडाझडती करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, भरदिवसा कोयत्याचा धाक दाखवित चोरट्यांनी ज्वेलर्स मालकाला धमकावून दुकानातील दागिने चोरून नेले. त्यामुळे आजूबाजूच्या सराफी पेढी व्यावसायिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण असून, चोरट्यांचा लवकर माग काढून त्यांना अटक करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
दुचाकीस्वार शस्त्रधारी टोळक्याने सराफी पेढीत शिरून मालकाला धमकाविले. त्यानंतर ५ तोळ्यांचे दागिने चोरून दरोडोखोर दुचाकीवरून पसार झाले आहेत. सीसीटीव्ही फुटेजनुसार त्यांच्या शोधार्थ तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. – संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, परिमंडळ तीन
स्वामी चिंचोलीत वारकर्यांना लुटणार्या टोळीचा तपास वेगाने
पुण्याहून पंढरपूरला दर्शनासाठी मोटारीतून चाललेल्या वारकर्यांना कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना सोमवारी (दि.३०) पहाटे सव्वा चारच्या सुमारास दौंड तालुक्यातील स्वामी-चिंचोली गावालगत महामार्गावर घडली होती. कोयताधारी चोरट्यांपैकी एकाने १७ वर्षीय मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणात दौड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून तपासाला गती देण्यात आली आहे. आजूबाजूच्या परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह छोट्या-मोठ्या आरोपींची धरपकड सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर अधीक्षक गणेश बिरादार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.