श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे शालेय विद्यार्थीनींचे पूजन
marathinews24.com
पुणे – या देवी सर्वभूतेषु, शक्तिरुपेण संस्थिता… नमस्तयै नमस्तयै नमो नम:… या मंगल स्वरांनी श्री महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. देवीनामाचा जयघोष करीत देवीस्वरुप असलेल्या लहान मुलींनी आपले पूजन होत असल्याचे दृश्य पाहिले आणि त्यावेळी प्रत्येक चिमुकलीच्या चेह-यावरील आनंद काहीसा वेगळा होता. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कन्यापूजन करताना मुलींचे पाद्यपूजन, औक्षण करुन त्यांना भेटवस्तू दिल्या.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग च्यावतीने सार्वजनिक नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात हुजूरपागा लक्ष्मी रस्ता आणि रेणुका स्वरुप शाळेतील १२५ मुलींचे कन्यापूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी, मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. कन्यापूजनानंतर ट्रस्टतर्फे सर्व मुलींना खाऊ व भेटवस्तू देण्यात आल्या. सुगंधित अत्तरपाणी मुलींवर शिंपडून त्यांचे पाद्यपूजन करण्यात आले.
अमिता अग्रवाल म्हणाल्या, तुम्ही मुलीनी सरस्वती मातेकडून बुद्धी मागा आणि खूप अभ्यास करा. महालक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर सदैव असावी आणि समाजातील दुष्ट शक्तींची लढण्यासाठी ताकद कालिमातेकडून मागा आणि तुमचे स्वतःचे रक्षणकरा. शक्ती, बुद्धी आणि धनधान्य देणा-या मातांची रुपे वेगवेगळी आहेत. लहान मुलींंमध्ये ही रुपे दिसतात. कन्या हे देवीचे स्वरुप असते. मात्र, मुलींनी प्रत्येक क्षेत्रात धैर्याने काम करायला हवे. खूप शिकून मोठे व्हायला हवे. तरच देवी प्रसन्न होईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रवीण चोरबेले म्हणाले, समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला जसे की पानशेत, खडकवासला धरणावर काम करण्यावर महिलांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. अनेक मुली या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मंदिरात आल्या होत्या. उपस्थित सर्वांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.























