दुसरी मुलगी जखमी, कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघात
marathinews24.com
पुणे – भरधाव कंटेनर चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा अपघात घडून वडिलांच्या डोळ्यादेखत १६ वर्षीय लेकीचा मृत्यू झाला आहे. तर खाली पडल्यामुळे वडिलांसह दुसरी मुलगी जखमी झाली आहे. हा अपघात मंगळवारी (दि.८ )दुपारी एकच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्यावर कपिलामृत डेअरीजवळ घडला आहे. प्रतिभा नाईक (वय १६) असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. तर वैष्णवी नाईक हिच्यासह तिचे वडील ज्ञानेश्वर नाईक जखमी झाले आहेत.
अल्पवयीन गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात आणणार-पोलीस आयुक्त अमितेश कुमार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार ज्ञानेश्वर नाईक हे मंगळवारी दुपारी मुलींची शाळा सुटल्यानंतर त्यांना घेउन कात्रज- कोंढवा रस्ता परिसरातून जात होते. त्यावेळी कपिलामृत डेअरीजवळ वळण घेताना (यु-टर्न) कंटेनरने चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात तिघेही खाली पडून जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान प्रतिभा नाईक हिचा भारती रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तिची बहीण वैष्णवी नाईक हिचा पाय मोडला आहे.
ज्ञानेश्वर नाईक यांनाही दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कंटेनर चालकासह वाहन ताब्यात घेतले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघात नेमका कसा घडला, कंटेनरचा वेग किती होता आणि चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला का, याचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.























