कोथरुडमध्ये महिलेने केली आत्महत्या
marathinews24.com
पुणे – पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून पत्नीने राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली आहे. ही घटना २२ ऑगस्टला सकाळी साडेदहाच्या सुमारास कोथरुडमधील सुतारदरा लेनक्रमांक २९ मध्ये घडली आहे. मोनाली गोविंद पवार (वय २५ रा. सुतारदरा, कोथरुड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती गोविंद पवार याच्याविरूद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात पैशांच्या व्यवहारातून तरूणाचे अपहरण, बेदम मारहाण – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनाली आणि गोंविद यांचे काही महिन्यांपुर्वी लग्न झाले होते. मात्र, गोविंदचे एका दुसर्या महिलेसोबत संबंध होते. त्यामुळे पवार दाम्पत्य यामध्ये सातत्याने वाद होत होते. वादातून गोविंद हा मोनालीला शिवीगाळ करणे, मारहाण करीत जाच करीत होता. जाचाला कंटाळून मोनालीने २२ ऑगस्टला राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेउन आत्महत्या केली. आत्महत्येला जबाबदार असल्याप्रकरणी तिच्या नवर्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे तपास करीत आहेत.
लिफ्ट मागितली अन तरुणाला भरदिवसा लुटले
दुचाकीवरुन घरी निघालेल्या तरुणाला लिफ्ट मागून दोघांनी स्वतः गाडी चालवायला ताब्यात घेतली. त्यानंतर त्यांना निमर्नुष्य ठिकाणी नेउन हाताने मारहाण करीत रोकड, दुचाकी, दोन मोबाइल असा ७५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे. ही घटना ४ सप्टेंबरला दुपारी दोनच्या सुमारास खराडी बायपास ते खुळेवाडी रस्ता परिसरात घडली आहे. याप्रकरणी तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण खासगी कंपनीत कामाला असून, ४ सप्टेंबरला दुपारी दोनच्या सुमारास खराडी बाह्यवळण मार्गावर जात होता. त्यावेळी दोघा चोरट्यांनी तरुणाला हाताने इशारा दाखवून लिफ्ट मागितली. त्यामुळे तरूणाने गाडी थांबवल्यानंतर दोघेजण त्याच्या गाडीवर बसले. काही अंतरावर गेल्यानंतर चोरट्यांनी तरुणाला गाडीवरुन खाली उतरवले. दमदाटी करुन ७०० रुपयांची रोकड, दुचाकी दोन मोबाइल असा ७५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे तपास करीत आहेत.






















