आरोपींची त्याच परिसरात काढली इभ्रत
marathinews24.com
पुणे – जुन्या भांडणाच्या रागातून अल्पवयीनाला ठार मारण्याच्या उद्देशाने हवेत कोयते फिरवणार्या कोयता गँगची पोलिसांनी धिंड काढली. ज्या परिसरात आरोपींनी दहशत माजविली होती, त्याचठिकाणी नेउन त्यांना बेअबू्र केले. ही घटना १६ मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडीतील न्यू पदमावतीनगरात घडली होती. गणेश बाळू कोळी (वय २०, रा. गणेशनगर) अविष्कार लक्ष्मण भालेराव (वय १९ रा. साईनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे ६ अल्पवयीन साथीदार ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
तक्रारदार महिलेचा अल्पवयीन मुलगा आणि आरोपींमध्ये जुन्या भांडणाचा राग होता. त्याच रागातून टोळक्याने त्याला ठार मारण्यासाठी बिबेवाडीतील न्यू पद्मावतीनगर गाठले. हातात कोयते घेउन त्यांनी मुलाला ठार मारण्यासाठी घर गाठले होते. त्यावेळी त्याच्या आईने घर बंद करून मुलाला वाचविले. त्यानंतर टोळक्याने महिलेच्या घरावर कोयते मारून दहशत निर्माण केली. हातातील कोयते हवेत फिरवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. तक्रारदार महिलेच्या रिक्षासह दुचाकीची तोडफोड केली. बिबवेवाडी पोलिसांनी तातडीने शोधमोहिम राबवून दोघांना अटक करीत इतरांना ताब्यात घेतले.
आरोपींची दहशत कमी करण्यासाठी बिबवेवाडी पोलिसांनी त्यांची धिंड काढली होती. कोणीही घाबरू नका, भाईगिरी-दादागिरी करणार्यांची माहिती आम्हाला द्या. दहशत माजविणार्याविरूद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांना दिली. दरम्यान, नागरिकांमधील भीती कमी करण्यासाठी आम्ही सातत्याने प्राधान्य देत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे यांनी सांगितले आहे. ही कामगिरी उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी धन्यकुमार गोडसे, एसीपी राजेंद्र मुळीक (गुन्हे), वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, उपनिरीक्षक अशोक येवले, पी. बी. कामथे, संजय गायकवाड, शिवाजी येवेले, सुमित ताकपेरे, दत्ता शेंद्रे, विशाल जाधव, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, प्रणय पाटील, रक्षित काळे यांनी केली.
मैत्रिणीला भेटायला आले अन हल्लेखोर जाळ्यात सापडले
तरूणावर धारदार शस्त्राने वार करून खूनी हल्ला करणार्या दोघांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची धिंड काढून पोलिसांनी नागरिकांमधील भीती कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकाश सिद्धाप्पा सोनकांबळे (वय २० रा. पद्मावती नगर, बिबवेवाडी) अहमद शब्बीर शेख ( वय २० रा. पर्वती पायथा, दत्तवाडी) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. तक्रारदार हे अप्पर डेपो जवळ भुतबंगला रोड, बिबवेवाडीत असताना त्यांच्यावर आरोपींनी हल्ला केला होता.
दगडाने व हातावर धारधार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. त्यानंतर शस्त्र हवेत फिरवत दहशत माजवली होती. आरोपी प्रकाश सोनकांबळे हा अतिषय चालाक व रेकॉर्डवरील असल्याने तो पोलीसांचे डावपेच ओळखून होता. ओळख लपवून वावरत असताना तपास पथकातील अंमलदार त्यांचा कसून शोध घेत होते. पोलीस अंमलदार शिवाजी येवले यांना आरोपी हे त्यांच्या मैत्रिणीकडे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पर्वती भागात सापळा रचून त्यांना शिताफितीने पकडले. त्यांना अटक करून ज्या भागात दहशत पसरवली होती, तेथेच त्यांची वरात काढून लोकांमध्ये जनजागृती केली.