ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – गृहप्रकल्पातील पाचव्या मजल्यावरुन पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात घडली. दुर्घटनेत एक मजूर जखमी झाला. बांधकाम मजुरांना सुरक्षाविषयक उपकरणे न पुरविता दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदाराविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहितकुमार जांगडे (वय ३५) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. दुर्घटनेत बांधकाम मजूर शिवनाथ सुपेकर (वय ४०) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी बांधकाम ठेकेदार वसंत अर्जुन निंबाळकर (वय ४४, रा. वारजे माळवाडी) यांच्याविरुद्ध काळेपडळ पोलिसांकडून गु्न्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस फौजदार विजय जगताप यांनी याबाबत काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गांजा विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या; दोन किलो गांजा जप्त – सविस्तर बातम्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात नियोजित गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. २२ एप्रिल रोजी जांगडे आणि सुपेकर हे पाचव्या मजल्यावर प्लास्टरचे काम करत होते. त्या वेळी तोल जाऊन दोघे जण पाचव्या मजल्यावरुन पडले. दोघांना गंभीर दुखापत झाली. जांगडे आणि सुपेकर यांना तातडीने वानवडीतील लष्कराच्या कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले. जांगडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.बांधकाम मजुरांना सुरक्षाविषयक उपकरणे न दिल्याने दुर्घटना घडल्याचे चौकशीत उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी ठेकेदार निंबाळकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक विनायक गुरव तपास करत आहेत.