माहिती व जनसंपर्क विभागाचा अभिनव उपक्रम
marathinews24.com
बारामती – गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आ णि धोरणात्मक निर्णयांची माहिती नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने ‘लोकसंवाद-२०२६’ (LokSamvad 2026 Baramati) या विशेष जनजागृती अभियान २४ सप्टेंबर पर्यंत राबविण्यात येणार आहे. शासकीय यंत्रणांनी व गणेश मंडळानी या उपक्रमात सहभागी होऊन शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत असल्याने या व्यासपीठाचा उपयोग शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती व्यापक स्वरूपात पोहोचविण्यासाठी करण्यात येत आहे. नागरिकांशी थेट संवाद साधणे, योजनांची माहिती देणे आणि पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. महिलांसाठीच्या कल्याणकारी योजना, बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणाच्या संधी तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या योजनांचा पात्र नागरिकांनी लाभ घ्यावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
अधिकृत माहितीचा थेट स्रोत
‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांच्या ठिकाणी संबंधित विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी नागरिकांशी थेट संवाद साधणार असून, योजनांची अधिकृत आणि सविस्तर माहिती या माध्यमातून मिळणार आहे. नागरिकांच्या प्रश्नांना संबंधित विभागाच्या प्रतिनिधींकडून थेट उत्तरे मिळत असल्याने योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही उपलब्ध होत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील गणेश मंडळांमध्ये ‘लोकसंवाद’ (LokSamvad 2026 Baramati) कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कृषी, महिला व बालविकास, शिक्षण, सामाजिक न्याय, आरोग्य, कौशल्य विकास, सहकार, सायबर सुरक्षा यासह विविध विभागांच्या योजना आणि उपक्रमांची माहिती या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.




















