१२९ व्या वर्धापन दिनानिमित्त दत्त मंदिरात भक्तिमय वातावरण; शहराच्या विकासासाठी महापौरांची प्रार्थना
marathinews24.com
पुणे – कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात सोमवारी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी महापौरांनी दत्तगुरूंचे दर्शन घेत पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुणेकरांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
शुभम आव्हाळे ठरला ‘साहित्य केसरी महाकाव्य करंडक २०२६’चा विजेता – सविस्तर बातमी
श्रीमती कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या १२९ व्या वर्धापन दिनानिमित्त महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते दत्त मंदिरात आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या, “लहानपणापासून मी दत्त मंदिरात दर्शनासाठी येत आहे. आज दत्तगुरूंची आरती करण्याचा मान मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजते. महापौरपदाची मोठी जबाबदारी स्वीकारल्यानंतर माझ्या हातून पुणेकरांच्या हिताचे निर्णय घडावेत, तसेच यंदा समाधानकारक पाऊस होऊन शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे तुडुंब भरावीत, अशी प्रार्थना मी दत्तगुरूंच्या चरणी केली आहे.”
या वेळी मंदिराचे अध्यक्ष पुनीत बालन, कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे व वर्षा थोरवे, खजिनदार सुरज थोरात, उत्सव प्रमुख नितीन पंडित, उप-उत्सव प्रमुख मनीषाताई खेडेकर, आर. एम. धारिवाल फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल-बालन तसेच विश्वस्त पराग काळकर आणि महेंद्रशेठ गाडवे उपस्थित होते.
महापौरांच्या हस्ते झालेल्या महाआरतीनंतर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दत्तगुरूंचे दर्शन घेतले.
‘‘पुणेकरांच्या संरक्षणाचं कर्तव्य बजावत असतानाच श्री दत्त महाराजांच्या दर्शनाला येण्याची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती ती आज फळाला आली. त्यातही सपत्नीक आरती करण्याची संधी मिळणं ही आमच्यासाठी खरोखर भाग्याची गोष्ट आहे. याबाबत ट्रस्टचे अध्यक्ष मा. पुनीत बालन आणि संपूर्ण विश्वस्त मंडळ या सर्वांचे मनापासून आभार!’’*
– अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे)
























