चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पाणीपुरी खाण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वार चोरट्यांनी जेष्ठ महिलेजवळ येउन त्यांच्या गळ्यातील २ लाख ४८ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले आहे. ही घटना २४ ऑगस्टला रात्री पावणेनउच्या सुमारास कोथरूडमधील दोडके प्लाझा सोसायटी जवळ घडली आहे. याप्रकरणी ६३ वर्षीय महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोघा दुचाकीस्वार चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यातील धनकवडी, आंबेगाव, लोणीकंद भागात घरफोडी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला कोथरुडमध्ये राहायला असून, त्यांचा पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय आहे. २४ ऑगस्टला रात्री पावणेनउच्या सुमारात त्या डुक्करखिंड परिसरात हातगाडी उभी करून पाणीपुरीची विक्री करीत होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी पाणीपुरी खाण्याचा बहाणा केला. महिलेजवळ येउन त्यांच्या गळ्यातील अडीच लाख रूपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे सुसाट पसार झाले. याप्रकरणी तक्रार दाखल होताच, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजुनसार तपासाला गती दिली आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा माग काढला जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक डोंगरे तपास करीत आहेत.





















