बारामतीतील नैसर्गिक शेती, जैविक निविष्ठा आणि विविध पीक पद्धतींची मणिपूर कृषी शिष्टमंडळाकडून पाहणी
marathinews24.c0m
बारामती – तालुक्यातील मौजे वढाणे येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा पुणे यांच्यावतीने मका पिकाविषयी चौथ्या नैसर्गिक शेतीशाळा वर्गाला मणिपूर कृषी शिष्टमंडळानी भेट दिली. यावेळी मणिपूर राज्यातील कृषी विभागाच्या कृषी संचालक श्रीमती मृनालीनी माईबम, आत्माच्या राज्य समन्वयक श्रीमती निशा निछोंगजम, कृषी अधिकारी इंद्रजीत सिंग यांच्यासमवेत १२ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.
मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध तपासणी मोहीम – सविस्तर बातमी
या शेतीशाळेत मका पिकावरील लष्करी अळीचे एकात्मिक तसेच सेंद्रिय पद्धतीने नियंत्रण करणे या विषयावर कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक आशिष भोसले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी निमार्क तयार करून त्याची फवारणी तसेच पक्षी थांबे पिकांमध्ये उभे करून एकात्मिक पद्धतीने लष्करी अळीचे नियंत्रण कसे करावे याविषयी तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत स्थापित संकल्प शेतकरी बचत गट, वढाणे गटामार्फत उभारण्यात आलेल्या जैव संसाधन केंद्रास भेट दिली. संसाधन केंद्रामध्ये जैविक निविष्ठा कशा पद्धतीने बनवल्या जातात याविषयी सविस्तर माहिती घेतली. यामध्ये बिजामृत,जीवामृत,घन जीवामृत, दशपर्णी अर्क, निमार्क, ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र, ई एम सोल्युशन, वेस्ट डी कंपोजर कल्चर. आदी जैविक तसेच नैसर्गिक पद्धतीने बनवण्यात येणाऱ्या निविष्ठा यांचे प्रात्यक्षिक पाहिले. गटातील प्रगतशील शेतकरी संभाजी चौधरी यांच्या ड्रॅगन फ्रुट मध्ये आंतरपीक चमेली तसेच सूर्यफूल या पिकांची प्रक्षेत्र भेट केली. तसेच शेतीशाळेच्या माध्यमातून गावामध्ये राबविण्यात आलेल्या चायनीज पद्धतीने लागवड मका प्रात्यक्षिक प्रक्षेत्राला देखील भेट दिली. सदरील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने गटांमार्फत तसेच सेंद्रिय शेती शाळेच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांची माहिती घेतली.
शिष्टमंडळाने तालुक्यामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत मौजे रुई या ठिकाणी वसंत चौधर यांच्या लाकडी तेल घाणा, प्रकल्पाची पाहणी केली. राष्ट्रीय तेलबिया प्रकल्पांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या बारामती ऍग्रो स्टार शेतकरी उत्पादक कंपनीला शिष्टमंडळाने भेट देऊन तेलबिया प्रक्षेत्रांची पाहणी केली यामध्ये सूर्यफूल भुईमूग आदी पिकांच्या प्लॉटची पाहणी केली. शिष्टमंडळासोबत महाराष्ट्र राज्याचे सेंद्रिय शेती विभागाचे राज्य समन्वयक गणेश तांबे, हवेली तालुक्याचे उप कृषी अधिकारी अमोल ढवळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रसाद राऊत उपस्थित होते.
या दौऱ्याचे नियोजन बारामती तालुक्यातील तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत मगर, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव, सहायक कृषी अधिकारी अमोल लोणकर तसेच कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख धीरज शिंदे सर यांनी केले. सदरील दौऱ्यात मणिपूरच्या शिष्टमंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील पीक पद्धतीचा सखोल अभ्यास केला. तालुक्यातील तेलबिया, फळपिके,फुलपिके, तृणधान्य, कडधान्य या सर्वच पिकांची लागवड पाहून शिष्टमंडळाने तालुक्यातील उपक्रमांचे कौतुक केले.






















