महंमदवाडीतील वाडकर मळा परिसरातील घटना
marathinews24.com
पुणे – शहराजवळ महंमदवाडीतील वाडकर मळा परिसरातील बुधवारी (दि. २८) पहाटे साडे चार वाजता साई कॉलनीत दुमजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली. आगीत चौघे जण भाजले असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच काळे बोराटेनगर अग्निशमन केंद्रातून तात्काळ अग्निशमन वाहन घटनास्थळी रवाना करण्यात आले.
पुण्यात संततधार पावसामुळे ८ ठिकाणी झाडे कोसळली – सविस्तर बातमी
अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचताच त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. यावेळी घरात पुरुष, महिला आणि दोन मुलांना भाजल्याचे आढळले. जवानांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने तातडीने सर्व जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवले. आगीत घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले असून आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. अधिक तपास अग्निशमन विभाग आणि पोलिसांकडून सुरू आहे.
अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी घरगुती विद्युत उपकरणे, गॅस व इतर ज्वलनशील पदार्थांची काळजीपूर्वक देखभाल करणे गरजेचे आहे, असे आवाहन अग्निशमन दलाच्या जवानांनी केले आहे.