सीमा शुल्क विभागाची कारवाई
marathinews24.com
पुणे – सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) अंमली पदार्थविरोधी पथकाने धडक कारवाई करत विक्रीसाठी बाळगलेले १ कोटी ७९ लाखाहून अधिक रकमेचे मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले. सणसवाडीतील फ्लॅटवर टाकलेल्या छाप्यात तब्बल ८९८ ग्रॅम ९४ मिली ग्रॅम मेफेड्रॉन केले आहे. दोन वर्षापूर्वी कुरकुंभमधील ड्रग कारखान्यावरील कारवाईनंतर पहिल्यांदाच पुणे ग्रामीण औद्योगिक भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली आहे. सागरमल ऊर्फ सागर बिश्नोई (वय २६, रा. जोधपूर, राजस्थान) याला अटक केली आहे. कस्टम विभागाचे महेंद्र पांचाल यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी मुळचा राजस्थानमधील असून सध्या तो सणसवाडी परिसरात राहायला आहे.
सीबीआय अधिकार्याची केली बतावणी; ३४ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
अंमली पदार्थांची विक्री करणारा सणसवाडी परिसरात राहत असल्याची माहिती अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. सीमा शुल्क विभागाने पडताळणी केल्यानंतर अधिकार्यांनी पंचांसमवेत ११ मार्चला रात्री रात्री उशिरा संबंधित सोसायटीतील फ्लॅटवर छापा टाकला. फ्लॅटच्या तपासणीदरम्यान बेडरूममध्ये ठेवलेल्या बॅगेत संशयास्पद वस्तू आढळल्या. अधिकार्यांनी बॅग उघडून पाहिली असता त्यात ऑफ व्हाईट रंगाची पावडर असलेल्या ६ प्लास्टिक पिशव्या सापडल्या. संबंधित पावडर मेफेड्रॉन (एमडी) असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे वजन ८९८ ग्रॅम ९४ मिली ग्रॅम असल्याचे आढळले.
बॅगेतून लहान प्लास्टिक पिशव्या, दोन छोटे चमचे तसेच इलेक्ट्रॉनिक वजन काटाही जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपीने मेफेड्रॉन लहान प्रमाणात पॅक करून ग्राहकांना विक्रीसाठी देत असल्याचे सांगितल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. कस्टम विभागाने आरोपीला विशेष न्यायालयात हजर केले. विशेष सरकारी वकील ऋषीराज वाळवेकर यांनी आरोपीने मेफेड्रॉनचा साठा कुठून आणला, तसेच तो कोणाला पुरवठा करत होता याचा तपास करण्यासाठी व अंमली पदार्थांच्या व्यवहारामागील इतर साथीदारांचा शोध घेऊन जाळे उघड करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) एस. जी. जोशी यांनी १३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास कस्टम विभागातील अमंली पदार्थ विरोधी पथक करत आहे.























