स्थानिक गुन्हे शाखा, शिरूर पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे- जिल्ह्यातील शिरूर परिसरात मेफेड्रॉनची तस्करी करण्याच्या तयारीत असलेल्या दोघा तस्करांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेसह शिरूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल २२ लाख रूपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. सुरेंद्रसिंह भैरूसिंह राठोड उर्फ राजपूत (वय २४ रा. बाडमेर, राजस्थान) आणि श्रवण तेजाराम बिष्णोई (वय ३१, रा. बाडमेर, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मोटारचालक डाॅक्टरांना मारहाण; टोळक्याविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी
पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या आदेशानुसार जिल्ह्याभरात नशामुक्त अभियान राबविण्यात येत असून, त्या पार्श्वभूमीवर ड्रग्ज तस्करीविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १८ ऑगस्टला शिरूर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तुषार पंधारे यांना मेफेड्रॉन तस्करांची माहिती मिळाली. एमडी बाळगून तस्करीच्या तयारीतील दोघेजण शिरूरमधील मलठण परिसरात ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने रात्री सव्वा बाराच्या सुमारास सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
आरोपी सुरेंद्रसिंह राजपूत आणि श्रवण बिष्णोई यांच्या ताब्यातून ११० ग्रॅम एमडी, दुचाकी असा २२ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तस्करांनी एमडी कोठून आणले होते. ड्रग्जची विक्री कोणाला केली जाणार होती, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर अधीक्षक डॉ. शुभम कुमार, उपविभागीय अधिकारी रवींद्र भोसले, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, एपीआय नितीन केनेकर, उपनिरीक्षक गोविंद ख्टिंग, संजय पड्याळ, जर्नादन शेळके, संजू जाधव, विकास पाटील, सागर धुमाळ, चेतन पाटील, संदीप खेडकर, रवी काळे यांनी केली.





















