विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षक हैराण
marathinews24.com
पुणे प्रतिनिधी – ओमप्रकाश आदमवाड – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात डासांच्या वाढत्या संख्येमुळे विद्यार्थी तसेच विद्यापीठात रात्रीच्या वेळी ड्युटीवर कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना गंभीर त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू झाल्यामुळे साचलेल्या पाण्यामुळे व घनदाट झाडी असल्यामुळे डासांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून, आरोग्यविषयक समस्या गंभीर होत चालल्या आहेत. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मुयरी जगताप विषयीच्या बातमीचे राज्य महिला आयोगाकडून खंडण – सविस्तर बातमी
विद्यार्थ्यांच्या मते, ग्रंथालय, वसतिगृहे आणि अभ्यासिकांमध्ये रात्रीच्या वेळी डासांचा प्रचंड त्रास होतो. अनेक विद्यार्थ्यांना ताप, अंगदुखी आणि अशक्तपणाच्या तक्रारी जाणवू लागल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांचीही भीती व्यक्त केली जात आहे.
तसेच काही सुरक्षा रक्षकांनी सांगितले की, रात्रीच्या ड्युटीदरम्यान डासांमुळे काम करणे कठीण झाले आहे. रात्री झाडाझुडपांमध्ये गस्त घालताना सतत डास चावतात, शरीरावर पुरळ येतात, रात्रभर अंगाला खाज सुटते, कर्तव्य ठिकाणी झाडी व नव्याने गवत उगवल्यामुळे डासांच्या संख्येत वाढ झाली असून डेंगू व मलेरिया सारखे आजार होण्याची भीती वाटत आहे, असे एका सुरक्षारक्षकाने सांगितले.
रूममध्ये ढेकणांचा होतोय मुलांना त्रास
विद्यापीठाच्या आवारात मुलांचे व मुलींचे वसतिगृह असून अनेक विद्यार्थ्यांच्या रूममध्ये ढेकणांचा देखील खूप मोठ्या प्रमाणात त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. रूममध्ये ढेकणं झोपू देईनात, बाहेर डास थांबू देईनात अशी अवस्था सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांची झाली आहे. याविषयी अनेक विद्यार्थ्यांनी वस्तीगृहाच्या प्रमुखांकडे तक्रारी देखील केलेले आहेत.
विद्यापीठ प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांनी आणि कर्मचारी वर्गाने फवारणी, साचलेले पाणी काढणे व व काही ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी केली आहे.