भारती विद्यापीठाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च स्थान मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – मंत्री हसन मुश्रीफ
marathinews24.com
पुणे – शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीच्या मूल्यांकनाकरीता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा आयोजित केली जाते. संबंधित स्पर्धेत भारती विद्यापीठाला प्रथम क्रमांकावर आणण्याकरीता सर्वांनी मिळून प्रयत्न करावे, याकरीता राज्य शासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल, धनकवडीत आयोजित भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा ३० वा स्थापना दिन समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, आमदार तथा भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर, आरोग्य विज्ञान शाखेच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, भारती विद्यापिठाच्या स्थापनेपासून शिक्षणाचा दर्जा उत्तम ठेवण्यात आला आहे, विद्यापीठाने संस्थेच्या विस्तारीकरण आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर भर दिला आहे. भारती विद्यापीठाला अभिमत विद्यापीठाला दर्जा मिळाला असून संस्थेला सर्व प्रकारचे अधिकार मिळाले आहेत.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर डॉ.तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे पार पडले. याकार्यक्रमात त्यांचे भाषण ऐकूण मंत्रमुग्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. भारती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला. भारती विद्यापीठात कौशल्य विकासाचे शिक्षण सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे-मंत्री मंगलप्रभात लोढा भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय हे खऱ्या अर्थाने ‘डायमंड युनिव्हर्सिटी’ आहे, काळाची गरज ओळखून याठिकाणी कौशल्य विकासाचे शिक्षण सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे,या कामी राज्यशासनाच्यावतीने सहकार्य करण्यात येईल.
भारती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ.पतंगराव कदम यांच्या अंगी साधेपणा, प्रमाणिकपणा, मनमिळाऊ, ज्ञानजिज्ञासा वृत्ती होती, त्यांनी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची शिकवण दिली. ते आपल्याकरीता प्रेरणादायी व्यक्तीमत्व होते. कदम परिवाराने या विद्यापीठाच्या माध्यमातून हा वारसा पुढे नेण्याचे काम करावे, असेही लोढा म्हणाले.
भारती विद्यापीठाच्या वाटचालीबाबत माहिती देऊन आमदार विश्वजित कदम म्हणाले, भारती विद्यापीठाला राष्ट्रीय अधिस्वीकृती परिषदेकडून सलग चार वेळेस ए++ शैक्षणिक दर्जा मिळाला आहे. विद्यापीठात उच्च शिक्षणासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यात येत आहे.कुलपती कदम म्हणाले, शिक्षणातून चारित्र्यसंपन्न पिढी निर्माण करण्यासोबतच समाजाला उपयोगी पडणारे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे. काळाची गरज ओळखून शैक्षणिक क्षेत्रात संशोधनाला महत्व देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांना भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या वार्षिक अहवाल २०२३-२४ चे प्रकाशन करण्यात आले.
डॉ. सावजी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.