कुख्यात गजा मारणेचा साथीदार रुपेश मारणेला बेड्या

पुण्यात संगणक अभियंता मारहाणीत ९ महिने होता पसार

marathinews24.com

पुणे – शहरातील कोथरूड भागात एका संगणक अभियंताला मारहाण प्रकरणात प्रसार झालेला गुंड गजानन मारणे याचा जवळचा साथीदार रुपेश मारणेला मुळशीतील आंदगावातून मंगळवारी पहाटे अटक करण्यात आली. संगणक अभियंता प्रकरणात मारणे हा गेले ९ महिने पोलिसांना गुंगारा देत होता. संगणक अभियंता तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गुंड गजा मारणे व त्याच्या साथीदारांविरुद्ध १७ फेब्रुवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल केला. त्या प्रकरणामध्ये मारणे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका ) कारवाई करण्यात आली. त्या गुन्ह्यात मारणे याचा साथीदार गुंड रुपेश कृष्णराव मारणे (वय ४०, रा. शास्त्रीनगर, पौड रस्ता, कोथरूड) हा फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागात पथके पाठवली होती. त्याचा ठावठिकाणा लागलेला नव्हता.

अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई – सविस्तर बातमी

सराईत रुपेश मारणे गेले ९ महिने पोलिसांना गुंगार देत होता. मारणे हा मुळशीतील आंदगाव परिसरात एका बंगल्यात राहत होता. त्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचे पथक तेथे रवाना झाला. पोलिसांच्या पथकाने पहाटे बंगल्याला वेढा घातला. मारणे पसार होण्याची शक्यता असल्याने बंगल्याच्या परिसरात साध्या वेशातील पोलीस कर्मचारी ठेवण्यात आले होते. पहाटेच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने दरवाजा वाजविला. एका महिलेने बंगल्याचा दरवाजा उघडला. पोलिसांचे पथक बंगल्यात गेले. मारणेला ताब्यात घेऊन त्याला सकाळी अटक करण्यात आली.

मारणे याच्याविरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. व्यावसायिकाचे अपहरण करुन ४ कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी तीन वषार्पूर्वी गजा मारणे, रुपेश मारणे यांंच्यासह १५ जणांविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली होती. त्यावेळीही रुपेश मारणे फरार झाला होता. तेव्हाही त्याला मुळशी तालुक्यातून अटक करण्यात आली होती.

श्री शिवजयंतीच्या दिवशी १९ फेब्रुवारीला कोथरूड परिसरातून मिरवणूक निघाली होती. त्यावेळी गजा मारणे आणि साथीदार मोटारीतून चित्रपट पाहण्यासाठी निघाले होते. भेलकेनगर चौकात मारणे टोळीतील गुंडांनी किरकोळ वादातून संगणक अभियंता तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली होती. सुरुवातीला या प्रकरणी पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता. घटनेची माहिती मिळताच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुंड गजा मारणे मारहाण करताना मोटारीत होता. त्याने साथीदारांना चिथावणी दिल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने मारणे टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती.

पोलिसांनी मारणे याच्यासह रुपेश मारणे, ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ, अमोल विनायक तापकीर (सर्व रा. शास्त्रीनगर, कोथरूड), तसेच मारणेचा भाचा श्रीकांत उर्फ बाब्या संभाजी पवार (रा. वडगाव रासाई, शिरूर) यांच्याविरुद्ध कारवाई केली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर रूपेश मारणे हा पसार झाला होता. त्यानंतर ३ मार्च रोजी ‘मारहाण प्रकरणात कोणी चिथावणी दिली नाही’, असे प्रतिज्ञापत्र संगणक अभियंत्याने विशेष न्यायालयात सादर केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×