सहायक पोलीस निरीक्षकासह पाच जणांचे निलंबन; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दणका
marathinews24.com
पुणे – मोक्कातील आरोपी कुख्यात गुंड गजानन उर्फ महाराज मारणे याला येरवडा ते सांगली असे पोलीस व्हॅनमधुन कारागृहात नेताना रस्त्यालगत ढाब्यावरती मटण बिर्याणी खाउ घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यासोबतच प्रवासादरम्यान मारणेच्या टोळीतील ८० ते १०० जणांनी अलिशान मोटारीतून पुणे ते सांगली असा पोलीस व्हॅनचा पाठलाग केला. त्याला कारागृहात दाखल करण्यासाठी तैनात असलेल्या पुणे गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक आणि चार पोलीस अमलदारांनी मारणेला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. याप्रकरणी संबंधित एपीआयसह पाच अमलदारांचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबन केले आहे. त्यासोबत तिघा सराईतांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सैनिक दरबार संपन्न – सविस्तर बातमी
सहायक पोलीस निरीक्षक सुरजकुमार राजगुरू, हवालदार महेश बामगुडे, हवालदार सचिन मेमाणे, हवालदार रमेश मेमाणे, शिपाई राहुल परदेशी अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत. तर सराईत सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ, बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपींनी प्रवासासाठी वापरलेल्या चार अलिशार मोटारी जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी दिली आहे.
आयटी अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात गजानन मारणेसह टोळीविरूद्ध २४ फेब्रुवारीला मोक्का कारवाई केली होती. त्यानंतर याप्रकरणी ओम धर्मजिज्ञासू, किरण पडवळ, अमोल तापकीर यांना पोलिसांनी तातडीने अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणी गजा मारणेला अटक करण्यात आली. मात्र, येरवडा कारागृहातंर्गत होणारी मारामारी, स्पेशल ट्रीटमेंट मिळू नये, यासाठी त्याला येरवडाऐवजी सांगली कारागृहात दाखल करण्याचा निर्णय पुणे गुन्हे शाखेने घेतला. त्यानुसार ३ मार्चला सहायक पोलीस निरीक्षक सुरजकुमार राजगुरू यांच्यासह ४ अमलदारांनी मारणेला पोलीस व्हॅनमध्ये बसवून सांगलीच्या दिशेन प्रवास सुरू केला. दरम्यानच्या काळात संबंधित अमलदारांनी मारणेच्या टोळीतील इतरांना वेळोवेळी माहिती दिली. त्यामुळे सराईत शिळीमकर, धुमाळ, मोहिते यांच्यासह ८० ते १०० मारणे समर्थकांनी अलिशान मोटारीतून पोलीस व्हॅनसोबत प्रवास सुरू केला.
जेवण करण्यासाठी संबंधित अधिकारी पोलीस कर्मचारी एका धाब्यावर थांबले असता, मारणे समर्थकांनी त्याला पोलीस व्हॅनमध्ये जाउन मटण बिर्याणी खाउ घातली. त्यासोबत काही रक्कम, नवीन कपडे देउन व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. दरम्यान हा सर्व प्रकार अधिकार्यांसह कर्मचार्यांसमक्ष होत असतानाही त्यांनी विरोध केला नाही. दरम्यान, मारणेला दिलेल्या व्हिआयपी ट्रींटमेंटचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित अधिकारी व कर्मचारी यामध्ये दोषी असल्याचे दिसून आले. त्यामुळे ५ जणांविरुद्ध तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मटण खाउ घालणार्या आरोपींच्या शोधार्थ पुणे गुन्हे शाखेची पथके कार्यरत आहेत.
सांगली कारागृहातही मारणेचा थाट, कर्मचारी पडत होते पाया, घेत होते गळाभेट
सांगली कारागृहात दाखल झाल्यानंतर त्याठिकाणीही गजा मारणे याचा मोठा थाट दिसून आला. त्याला कारागृह कर्मचार्यांकडून व्हीव्हीआयपी ट्रींटमेंट देण्यात आली. काही कर्मचार्यांकडून मारणेच्या पाया पडणे, त्याला जादू की झप्पी देणे, गळाभेट घेणे, त्याच्या मागणीनुसार विविध वस्तूंचा पुरवठा केला. याप्रकरणी कारागृहातील काही कर्मचार्यांनी तक्रारी दाखल केल्यानंतर वरिष्ठ अधिकार्यांनी चौकशी केली. त्यावेळी संबंधित कारागृह कर्मचार्यांचा थिल्लरपणा दिसून आला. त्यानंतर १८ मार्चला मारणेला पुन्हा येरवडा कारागृहात वर्ग करण्यात आले. दरम्यान, सांगली कारागृहात मारणेला व्हीआयपी ट्रींटमेंट देणार्यांविरूद्धही कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.