दुबई ते पुणे प्रवासानंतर व्यावसायिकाला आला अनुभव
marathinews24.com
पुणे – विमान प्रवासात प्रवाशाच्या पिशवीतून दीड लाख रुपये लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली. पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पहाटे दुबई ते पुणे असा प्रवास करून उतरल्यानंतर प्रवाशाने पिशवीची तपासणी केल्यानंतर रोकड चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुयोग सपकाळ (वय ४५, रा. पिंपरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
धक्कादायक…महाविद्यायाच्या वसतिगृहात विद्यार्थी मृतावस्थेत सापडला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपकाळ हे व्यावसायिक असून ते कामानिमित्त दुबईला गेले होते. दुबईतील त्यांच्या मित्राने त्यांना दीड लाख रुपये वैयक्तिक व्यवहारासाठी रोख स्वरूपात दिले होते. ही रक्कम त्यांनी पिवळ्या रंगाच्या ट्रॉली बॅगेत ठेवली होती. गुरुवारी (१ मे) रात्री पावणेदहाच्या सुमारास ते दुबई विमानतळावर पोहोचले. त्यानंतर ते विमानाने पुण्याकडे रवाना झाले. त्यांनी ट्रॉली बॅग विमानात तपासणी करुन (चेक-इन) दिली होती. शुक्रवारी (२ मे) रोजी पहाटे ते पुणे विमानतळावर पोहोचले. तपासणी झाल्यानंतर त्यांना पिशवी मिळाली, तेव्हा पिशवीचे कुलूप तुटल्याचे आढळून आले. साहित्य अस्ताव्यस्त स्थितीत होते. त्यांनी तपासणी केली असता दीड लाख रुपये चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी विमातनळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.