उपचारासाठी साडेआठ लाख रुपयांची गरज
marathinews24.com
पुणे – पीएमपीएमएल बसची धडक बसल्याने ५१ वर्षीय कमवता पुरुष गंभीररित्या जखमी झाल्याची घटना २० ऑगस्टला दुपारी साडेबाराच्या सुमारास खडकी परिसरातील एल्फिन्स्टन रोड घडली आहे. त्यांच्यावर उपचारासाठी कुटुंबाकडे पैसे नाहीत. त्यामुळे सामाजिक संस्थासह देणगीदारांना त्यांनी मदतीचे आवाहन केले आहे. प्रमोद शंकर कदम वय ५१ ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
इलेक्ट्रिकल दुकानातून ५ लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी
अपघातात जखमी प्रमोद कदम यांच्यावर शस्त्रक्रिया, उपचारांची गरज आहे. रुग्णालयाच्या अंदाजानुसार उपचारांचा अंदाजे ८ लाख ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून, प्रमोद कदम हे कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य आहेत. त्यामुळे, त्यांच्या उपचारासाठी कुटुंबाने सामाजिक संस्था आणि देणगीदारांना आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.
कदम दाम्पत्य हे मुलगा ओंकार याच्यासह खडकी कंटेनमेंट हॉस्पिटलमध्ये गेले होते. परत येत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारचालकाने अचानकपणे दरवाजा उघडला. त्यामुळे प्रमोद खाली पडले गेले. त्याचवेळी पाठीमागून बस आल्यानंतर त्यांना गंभीर दुखापत झाली. पोलिसांनी कारचालक शुभम दराडे यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली आहे. बसचालक गोरखनाथ किशोर चव्हाण (वय ३१ रा. शेवाळवाडी, हडपसर) याची ओळख पटली आहे. दरम्यान, जखमी प्रमोद कदम यांना सुरुवातीला कँटोन्मेंट रुग्णालयात नेले. त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात हलवले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना चांगल्या उपचारांसाठी वाकडमधील साईश्री व्हिटालाइफ रुग्णालयात दाखल केले.
जखमी प्रमोद यांच्या उजव्या हाताच्या अनेक भागांत गंभीर दुखापती आढळून आल्या आहेत. नसा आणि रक्तवाहिन्यांची शस्त्रक्रिया तसेच त्वचारोपणासह पुढील उपचार करावे लागणार आहेत. ते कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य आहेत. ते गेल्या महिन्याभरापासून खडकी येथील कॅन्टोन्मेंट रुग्णालयात हाऊसकीपर म्हणून काम करत आहे. त्याची कमाई हाच घरखर्चाचे एकमेव स्रोत होता. अपघातानंतर त्याचे उत्पन्न थांबले आहे आणि वैद्यकीय खर्चही प्रचंड वाढला आहे. लाखो रुपये खर्च येणारा हा उपचार स्वतःच्या पैशाने परवडण्याइतकी त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत नाही. त्यामुळे, त्यांनी सामाजिक संस्था, देणगीदार आणि मदत करू इच्छिणार्या नागरिकांना आवाहन केले आहे. कुटुंबाने सरकारकडेही आर्थिक मदतीची मागणी केली आहे. शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी तर उपचारांसाठी आर्थिक मदतीची विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. खडकी पोलिसांनी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.





















