दागिने खरेदी केल्याचे पैसे मागितल्यावरून दिली होती धमकी
marathinews24.com
पुणे – पोलीस दलातील वरिष्ठ अधिकार्याच्या नावाचा गैरवापर करून पोलीस हवालदाराने सराफाकडून ८ लाख २२ हजार २२० रूपयांचे दागिने खरेदी केले होते. त्यानंतर सराफाने दागिन्यांचे पैसे मागितल्यामुळे टाळाटाळ करीत त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलीस हवालदाराला निलंबित केले आहे. गणेश अशोक जगताप (नेमणूक-विशेष शाखा) असे निलंबित केलेल्या हवालदाराचे नाव आहे. पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
अपघाताचा रचला बनाव, खोट्या माहितीच्या आधारे लाटला विमा – सविस्तर बातमी
पोलीस गॅझेटमधील आदेशानुसार, हवालदार गणेश जगताप यांची मुख्यालय ते विशेष शाखा अशी बदली ३१ जानेवारी २०२४ मध्ये झाली होती. ते संबंधित शाखेत हजर न होता, ते ६ फेबु्रवारी २०२४ पासून रूग्णनिवदेन रजेवर गेले होते. त्यानंतर २१ ऑगस्ट २०२४ मध्ये जगतापने तक्रारदार सराफा मनीष सुरेश सोनिग्रा (रा. भवानी पेठ) यांच्या नवकार ज्वेलर्स शॉपमधून ८ लाख २२ हजार २२० रूपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केले. दागिने खरेदीवेळी जगतापने पोलीस दलातील माजी वरिष्ठ अधिकार्याच्या नावाचा गैरवापर केला.
त्यानंतर मनीषला दागिन्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ केली. तक्रारदार मनीषने दागिन्यांच्या पैशांची मागणी केली असता, जगतापने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्याबाबतचा कसुरी अहवाल विशेष शाखेला प्राप्त झाला होता. बेजबाबदार, नैतिक अधःपतनाचे गैरवर्तन केल्याप्रकरणी हवालदार गणेश जगताप यांना निलंबित केले आहे.