बिबवेवाडी पोलिसांकडून आरोपींना २४ तासांत बेड्या
marathinews24.com
पुणे – पोलीस तक्रार केल्याच्या रागातून तरूणावर थेट गोळीबार करीत खुनाचा प्रयत्न करणार्या ७ आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी २४ तासांत अटक केली आहे. ही घटना १८ मे रोजी मध्यरात्री सव्वा दोनच्या सुमारास बिबवेवाडी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ घडली होती. दरम्यान, तपास पथकाने तातडीने सुत्रे फिरवित आरोपींना अटक केली. त्यानंतर त्यांची बिबवेवाडी परिसरात धिंड काढून लोकांमधील भीती कमी करण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारे दादागिरी, दहशत निर्माण करणार्यांविरूद्ध कठोर कारवाई करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे यांनी दिली आहे.
स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशांचे दागिने चोरणार्या महिलेला अटक – सविस्तर बातमी
फिर्यादीचे दाजी उमेश शिंदे व गणेश सुर्यवंशी यांनी अक्षय भालकेविरुद्ध डायल ११२ वर तक्रार केली होती. तक्रारीचा राग मनात धरून बाळा गाडे, सनी शिंदे, बाब्या पंधेकर, गणेश भालके, बंटी म्हस्के आणि देवा डोलारे यांनी तक्रारदार तरूणाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली. बाळा गाडे याने पिस्तुलातून गोळी झाडून खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०९/२०२५ नुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलीस अंमलदार प्रणय पाटील, सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, विशाल जाधव यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे सनी शिंदे, बाब्या पंधेकर, बंटी म्हस्के, अक्षय भालके आणि गणेश भालके यांना चैत्रबन वसाहतीतील पडक्या घरातून अटक केली.
गुन्हे शाखा युनिट सहाचे सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे आणि त्यांच्या पथकाने आरोपी देवा डोलारे याला बोपदेव घाटातून अटक केली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, निरीक्षक सुरज बेंद्रे (गुन्हे) उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अंमलदार प्रणय पाटील, सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, विशाल जाधव, रक्षित काळे, दत्ता शेंद्रे, आशिष गायकवाड यांनी केली.