गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाईचा बडगा
marathinews24.com
पुणे – कायदा सुव्यवस्थेसह गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार परिमंडळ सातच्या हद्दीत विविध पोलीस ठाण्यातंर्गत असलेल्या तब्बल २२ सराईतांना एकाचवेळी तडीपार करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांच्या दणक्यामुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे. तसेच काही दिवसांपुुर्वी परिमंडळ दोनचे उपायुक्त मिलींद मोहिते यांनीही १२ जणांना तडीपार केले होते. दरम्यान, तडीपार केलेले गुन्हेगार त्यांच्या हद्दपारीच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष ११२ किंवा संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार – सविस्तर बातमी
गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात तडीपारीची कारवाई केली आहे. परिमंडळ सात अंतर्गत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल २२ सराईत गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ५५, ५६ आणि ५७ अन्वये तडीपारी केली आहे. विमानतळ, चंदननगर, वाघोली, लोणीकंद आणि लोहगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संबंधित गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये जीवघेणा हल्ला, गुन्ह्याचा कट रचणे, बेकायदेशीररीत्या अग्निशस्त्र बाळगणे, व्हिडिओ प्रसारित करून गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणे, धमकी देणे, जबरी चोरी, दहशत निर्माण करणे, गंभीर दुखापत करणे या गुन्ह्यांचा समावेश आहे.
तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे
गुलाम उर्फ गुड्डू नवरुलहक मुस्तफा खान, शुभम सुखदेव सोनवणे, दीपक तुकाराम गायकवाड, अतुल गौतम ढोकरे, अनिल साहेबराव वीर, मुकेश बजरंग बुरुंगे, सागर गौतम अवधूत, आरती संजय साठे उर्फ जमदाडे, रिना पवन राजपूत, सागर राजू उर्फ राजेंद्र भालसिंग, सचिन किसन शिंदे, हर्षद कुमार शिंदे, रोशन कुमार साहू, अंजिक्य दादासाहेब मस्कुटे, संतोष गोविंद जाधव, प्रकाश बाबुराव शिवभक्ते, दत्तात्रय रंगनाथ गायकवाड, सुमित सुशील बोरगे, गणेश जालिंदर गलांडे, महेश देवराम लोंढे, अतिश उमेश डिंगरे, सुमित उर्फ बंटी रणजित गायकवाड यांना तडीपार करण्यात आले आहे.
परिमंडळ सातमधील १०० हून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हेगारी पासून परावृत्त करण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणखी १०० हून अधिक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.
अबिनाश कुमार, पोलीस उपायुक्त, परिमंडळ सात
























