बिहारमध्ये पुण्यातील उद्योजकाची हत्या; चोरट्यांनी जाळ्यात अडकवून केला खून
Marathinews24.com
पुणे – शहरातील कोथरूड परिसरात राहणार्या एका मराठी उद्योजकाची बिहारमध्ये हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित व्यावसायिक पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओइपी)चे माजी विद्यार्थी होते. लक्ष्मण साधू शिंदे ( वय ५५, रा. डीपी रस्ता, कोथरूड) असे हत्या झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. ते रत्नदीप कास्टिंगचे संस्थापक म्हणून कार्यरत होते. तब्बल १०० कोटी रुपयांच्या ऑर्डरसंदर्भात चर्चा करण्यासाठी ते बिहारला गेल्यापासून ते बेपत्ता झाले होते. अखेर त्यांचा मृतदेह आढळून आला असून, आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी खूनाचे नेमके कारण पोलिसांकडून शोधले जात आहे.
प्रवाशावर चाकूचा धाक दाखवत दीड लाखांचा आयफोन लंपास – सविस्तर बातमी
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी काही दिवसांपुर्वी उद्योजक लक्ष्मण शिंदे यांना झारखंडमधील खाण उपकरणांशी संबंधित सुमारे १०० कोटी रुपयांची ऑनलाईन ऑर्डर दिली होती. त्यानंतर चर्चेसाठी त्यांना बिहारमधील पटना येथे आमंत्रित केले होते. त्यानुसार ११ मार्चला शिंदे हे विमानाने पटना येथे पोहोचल्यानंतर, त्यांनी संबंधित व्यक्तींसोबत चर्चा केली. त्यारात्री त्यांची कुटूंबियासोबत बोलणे झाले होते. मी झारखंडला चाललो आहे, त्याठिकाणी खाणकाम प्लँटमध्ये मशीनरीचे काम पाहण्यासाठी जाणार आहे. त्यानंतर त्यांचा कुटूंबियासह इतरांसोबत कोणाचीही संपर्क झाला नाही. तसेच त्याच्या फोनवरून पाठवलेले सर्व मेसेज डिलीट केले. आरोपींने त्यांचे अपहरण करुन दूरच्या ठिकाणी नेले. त्यांच्या बँकखात्यातून रक्कम वर्ग करुन घेत त्यांची हत्या केल्याची माहिती पटना पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान शिंदे बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाने तातडीने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने कोथरूड पोलिसांनी दोन दिवसांहून अधिक काळ त्याचा ठावठिकाणा शोध घेतला. त्यांचे लोकेशन बिहारमध्ये असल्याचे आढळून आले. पटना, गया परिसरात त्यांची शोधाशोध करण्यात आली. अखेर १४ एप्रिलला शिंदे यांचा मृतदेह बिहारमधील जहानाबाद येथे आढळून आला. पोलिसांच्या अंदाजानुसार १२ एप्रिलला त्यांची हत्या केली असावी. बिहार पोलिस आणि पुणे पोलिसांनी या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्वांची ओळख पटवून त्यांना अटक केली आहे. मंगळवारी (दि. १५ एप्रिलला) संध्याकाळी चारच्या सुमारास शिंदे यांचे पार्थिव पुणे विमानतळावर आणले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर कोथरूडमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अशी माहिती त्यांच्या नातलगांनी दिली आहे.