खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – घरासमोर पाणी सांडल्याने झालेल्या वादातून एकाला गजाने बेदम मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात असलेल्या महापालिका वसाहतीत ही घटना घडली. मुकेश धोबी (वय ३४, रा. म्हसोबा मंदिरासमोर, पीएमसी काॅलनी, वाकडेवाडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शंकर खांडेकर, भिकाजी खांडेकर, मुस्कान खांडेकर (तिघे रा. पीएमसी काॅलनी, वाकडेवाडी) अली इराणी यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धोबीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सराफी पेढीचा दरवाजा उचकटून दीड लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धोबी आणि खांडेकर कुटुंबीय शेजारी आहेत. घरासमोर पाणी सांडल्याने त्यांच्यात वाद झाला होता. मंगळवारी (८ जुलै) सकाळी साडेसातच्या सुमारास मुकेश धोबी हा कामानिमित्त घरातून बाहेर पडला. त्यावेळी खांडेकर आणि इराणी याने त्याला शिवीगाळ केली. त्यांच्यात वादावादी झाली. खांडेकर यांनी धोबीच्या डोक्यात गज मारला, तसेच त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
भांडणात मध्यस्थी करण्यासाठी आलेले धोबी याची पत्नी, भाऊ, आई, वडील आणि भावजयीला आरोपी खांडेकर, इराणी यांनी गजाने मारहाण केली. त्यांना विट फेकून मारली. सहायक पोलीस निरीक्षक देशमुख तपास करत आहेत.
उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळून दुचाकीस्वार ठार
Crime News : उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कर्वे रस्त्यावरील नुकतीच घढली. राजसिंग टमाट्टा (वय २५, सध्या रा. कम्युनिटी कॅफे, कोथरूड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत विनोद पिल्ले (वय ५५, रा. प्राची अपार्टमेंट, घोरपडी गाव) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वे रस्त्यावरील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी दुमजली उड्डाणपुलावरुन दुचाकीस्वार राजसिंग हा २ जूुलै रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास भरधाव वेगाने निघाला होता. त्या वेळी एसएनडीटी मेट्रो स्थानकाजवळ भरधाव दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीस्वार राजसिंग हा उड्डाणपुलाच्या कठड्यावर आदळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या राजसिंग याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक डोंगाळे तपास करत आहेत.