अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – श्वान फिरविणाऱ्या व्यक्तीला व्यवस्थित पकडण्यास सांगितल्याने त्याने वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने श्वान अंगावर सोडल्याचा प्रकार एरंडवणे येथे घडला. या घटनेत तरुणाला दुखापत झाली असून, अलंकार पोलिस ठाण्यात श्वान मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेदांत पासलकर (वय २५, रा. गणेशनगर, शनि मारुती मंदिर लेन, एरंडवणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत किसन फाले (वय ४२, रा. गणेशनगर, एरंडवणे) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
१५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, वार करणार्या टोळीला अटक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फाले हे २३ ऑगस्टला रात्री दहाच्या सुमारास घरी जात होते. आप्पासाहेब कुलकर्णी पथ येथून गुळवणी महाराज रोडच्या दिशेने जात असताना जोशी स्वीटसमोरील फुटपाथवर आरोपी त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाच्या श्वानाला फिरवत होता. त्यावेळी श्वान अचानक फाले यांच्या अंगावर धावून आला. फाले यांनी आरोपीला श्वान व्यवस्थित पकडण्यास सांगितले. त्यावरून आरोपीने त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने ताब्यातील श्वान फाले यांच्या अंगावर सोडला. श्वानामुळे फाले यांना दुखापत झाली. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २९१, ११८(१) आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.























