अधिकाऱ्याकडून विसर्जन घाटांची पाहणी
marathinews24.com
पुणे – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दल सज्ज झाले असून, विसर्जनाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रमुख विसर्जन घाटांवर अधिकारी, जवान आणि जीव रक्षकांची नियुक्ती केली आहे. शहरातील १५ प्रमुख विसर्जन घाटांवर अग्निशमन दलाचे २० अधिकारी, २० जवान आणि १२० जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. जीवरक्षकांकडे लाईफ जॅकेट, लाईफ रिंग तसेच दोरांसह आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
गणेशोत्सवात मध्यवर्ती पेठात माल वाहतुकीसाठी नियमाचे बंधन – सविस्तर बातमी
मुख्य अग्निशमन अधिकारी गणेश सोनुने यांनी सोमवारी संगम घाट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटासह शहरातील विविध विसर्जन घाटांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी तैनात अधिकारी, जवान आणि जीवरक्षकांशी संवाद साधून विसर्जनासाठी येणार्या नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या. गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहण्याबरोबरच नदीपात्रात कोणीही धोकादायक पद्धतीने उतरू नये, याची काळजी घेण्याचे निर्देशही देण्यात आले. दीड, पाच, सात दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासह अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यामुळे विसर्जन घाटांबरोबरच मिरवणूक मार्गांवरही अग्निशमन दलाची वाहने सज्ज ठेवण्यात आली आहेत. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने मदत मिळावी, यासाठी पथकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. विसर्जनाच्या कालावधीत नदी, तलाव आणि घाट परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दलाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. जीवरक्षकांचे पथकही घाटांवर सतत लक्ष ठेवणार आहे.




















