पहाटे २ ते सकाळी ११ या वेळेतच दुकानांतील माल लोड-अनलोडिंगला परवानगी
marathinews24.com
पुणे – गणेशोत्सव काळात शहरातील मध्यवर्ती भागात होणाऱ्या गर्दीच्या प्रार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी व्यापाऱ्यांच्या माल वाहतुकीबाबत निर्णय घेतला आहे. पेठ भागातील दुकानांमध्ये माल ने-आण (लोडिंग व अन-लोडिंग) करण्यासाठी वेळेचे बंधन घालण्यात आले असून, १४ ते २४ सप्टेंबर कालावधीत पहाटे २ ते सकाळी ११ या वेळेतच हलक्या मालवाहू वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.
पुण्यात सराइतांविरुद्ध कारवाईचा बडगा – सविस्तर बातमी
गणेशोत्सवात पुण्यातील मुख्य बाजारपेठा आणि मध्यवर्ती पेठांमध्ये नागरिकांची व भक्तांची गर्दी होते. या काळात रस्त्यांवरून धावणाऱ्या मोठ्या व मालवाहू वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताची किंवा सुरक्षेची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. नागरिकांच्या जिवाचा धोका टळावा आणि शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक शाखेकडून विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. बोहरी आळी, गणेश पेठ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ, मंडई परिसर, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड व इतर मध्यवर्ती पेठांचा भाग यासाठी ही नियम लागू केले आहे. वाहतूक नियमांमधून अत्यावश्यक सेवेतील वाहनांना पूर्णपणे वगळण्यात आले आहे. रुग्णवाहिका, अग्निशामक दल, पोलीस वाहने आणि इतर आपत्कालीन सेवा पूर्ववत सुरू राहणार आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या वेळेचे काटेकोर पालन करून व्यापाऱ्यांनी आपला माल लोड अनलोड करावा. गणेशोत्सव उत्साहात आणि वाहतूक कोंडीमुक्त पार पाडण्यासाठी सर्व व्यावसायिक व नागरिकांनी वाहतूक पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.




















