Breking News
नीट पेपर फुटीचा मास्टरमाइंड पी. व्ही. कुलकर्णीला पुण्यातून अटकसंजय दराडे पुण्याचे नवे सह पोलिस आयुक्तयुट्यूब पाहून बनवला बॉम्ब; आरोपीला नागपूरमधून अटकपुण्यात २० मे रोजी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना शिबिर‘ॲग्री हॅकॅथॉन’च्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारपुणे जिल्हा नियोजन बैठकीत अवकाळी पाऊस, वाहतूक कोंडीची चर्चाखरीपासाठी खते-बियाण्यांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करा; बोगस निविष्ठांविरोधात कारवाई कराशिवसेना पुणे जिल्हाप्रमुखपदी रामदास धनवटे यांची नियुक्तीकिल्ले पुरंदरावर “जयतु शंभू” कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसादमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पात्र उमेदवारांना प्रमाणपत्रे प्राप्त करून घेण्याचे आवाहन

‘ॲग्री हॅकॅथॉन’च्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ आयोजित कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन; दुसऱ्या ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’चे उपमख्यंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

marathinews24.com

पुणे – गतवर्षी जून महिन्यामध्ये आयोजित पुणे ॲग्री हॅकॅथॉनातील १६ नाविण्यपूर्ण उत्पादनांपैकी निवडलेल्या ४ उत्पादनांना कृषी यांत्रिकीकरण योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही राज्य शासनामार्फत सुरु आहे. या वर्षी विविध राज्यातील सुमारे १ हजार ३०० स्पर्धकांनी आपल्या नवकल्पना सादर केल्या असून यामध्ये महाराष्ट्र राज्यातून ८६७ स्पर्धकांनी भाग घेतला आहे. यामुळे अॅग्री हॅकॅथॉनच्या यशस्वी आयोजनातून पुणे हे विद्येच्या माहेरघरासोबतच कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून ओळखले जात आहे, असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

पुणे जिल्हा नियोजन बैठकीत अवकाळी पाऊस, वाहतूक कोंडीची चर्चा – सविस्तर बातमी

संयुक्त राष्ट्रांने यंदाचे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले असून या पार्श्वभुमीवर राज्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमामध्ये अधिकाधिक महिला शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

'ॲग्री हॅकॅथॉन'च्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

कृषी विभागाच्यावतीने कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर येथील दुसऱ्या पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६ च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्रमणी, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, ग्रीनरोड इनोवेशन इस्रायलचे अध्यक्ष शफरीर गोडेल, जुरी कमिटी सह अध्यक्ष प्रा.डॉ. के. ई. लवांडे, डॉ. राजाराम देशमुख, सुपर जुरी तथा महाराष्ट्र कृषी तंत्रज्ञ संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. उमाकांत दांगट आदी उपस्थित होते.

पवार म्हणाल्या, महाराष्ट्र हे कृषी क्षेत्रात देशात आघाडीवर असलेलं राज्य असून ऊस, साखर, भाजीपाला उत्पादन आणि फलोत्पादनात तसेच कृषी निर्यातीतदेखील अग्रेसर आहे. कृषी क्षेत्रासाठी ‘कृत्रीम बुद्धीमत्ता धोरण’ (एआय पॉलिसी) जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एआय पॉलिसीकरीता सन २०२५ च्या अर्थसंकल्पात यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करुन ठेवली होती. तसेच त्यांच्या प्रयत्नामुळेच बारामती येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कृत्रीम बुद्धीमत्ता केंद्र उभारण्यात आले आहे.

त्या पुढे म्हणाल्या, राज्य शासनाने कृत्रिम बुद्धीमत्तेबरोबरच कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी कृषी समृध्दी योजना जाहीर केली. त्यासाठी अर्थसंकल्पात २ हजार कोटी रुपयांची तरतुद केली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खतांची अडचण येणार नाही याची काळजी घेतली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार यावर्षी पाऊस कमी झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून पुणे ॲग्री हॅकॅथॉनचे आयोजन

हॅकॅथॉन ही संकल्पना प्रामुख्यानं माहिती व तंत्रज्ञान आणि वित्तीय क्षेत्रात वापरली जात होती, कृषी क्षेत्रातील विविध नवनवीन उपाययोजना पुढे येवून कृषी विकासात त्याचा फायदा होईल, याच धर्तीवर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून अॅग्री हॅकॅथॉनचे आयोजन करण्याची संकल्पना पुढे आली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या संकल्पनेला भक्कम पाठिंबा दिला. गतवर्षी जून महिन्यामध्ये पुणे अॅग्री हॅकॅथॉने प्रथमच आयोजन करण्यात आले आणि ते यशस्वी देखील झाले. या हॅकॅथॉनमध्ये १६ नाविण्यपूर्ण उत्पादनांची निवड करण्यात आली आणि विजेत्यांना मोठी पारितोषिकंही देण्यात आली. आजच्या घडीला १६ पैकी १२ उत्पादनांना कृषी विद्यापिठांचे प्रमाणिकरण प्राप्त झाले आहे. यशस्वी नवतंत्रज्ञांन कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स यासारख्या संस्था सहकार्य करीत आहेत. निवडलेल्या उत्पादनांपैकी ४ उत्पादनांना कृषी, यांत्रिकीकरणयोजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही सुरु आहे.

यंदाच्या ॲग्री हॅकॅथॉनमध्ये महाराष्ट्र राज्यातील ८६७ स्पर्धक सहभागी

यावर्षीच्या हॅकॅथॉन स्पर्धेसाठी ९ विषयांचा समावेश आहे. यावर्षी विविध राज्यातील सुमारे १ हजार ३०० स्पर्धकांनी आपल्या नवकल्पना सादर केल्या असून महाराष्ट्र राज्यातून ८६७ स्पर्धकांनी भाग घेतला आहे. सलग दुसऱ्या वर्षी या पुणे ॲग्री हॅकॅथॉनचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल राज्याचा कृषी विभाग, जिल्हा प्रशासनाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. हॅकॅथॉनमध्ये सहभागी उत्पादन, संशोधन, प्रयोग या शेतकऱ्यांकरिता उपयुक्त असून याचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती पवार यांनी केले.

कृषी क्षेत्रात अडीअडचणीवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व नवकल्पनांचा वापर करण्याचे आवाहन

बदलत्या काळानुरुप शेतकऱ्यांसमोर अनियमित पाऊस, पाण्याची टंचाई, मातीची निकृष्ठता, बाजारपेठेतील अस्थिरता, हवामान बदल आणि वाढता उत्पादन खर्च यासारखी विविध आव्हाने आहेत. या आव्हानांना सामोरे जाण्याकरिता कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, नवकल्पना आणि युवकांच्या उर्जेचा योग्य वापर खरा उपाय ठरेल. ॲग्री हॅकॅथॉन मध्ये सहभागी युवक, अभियंते, डेटा साइंटिस्ट, कृषी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि स्टार्टअप उद्योजक कृषी क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी आपली बुध्दिमत्ता आणि सर्जनशीलता वापरतील. आपल्या उपायोजना, नवकल्पना शेतकऱ्यांच्या शेतात, मोबाईल अॅपमध्ये, ड्रोनमध्ये, सेन्सर्समध्ये आणि एआय आधारित प्लॅटफॉर्ममध्ये प्रत्यक्षात वापरले जातील. कृषी विभागानं या हॅकॅथॉनसाठी जे प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिले आहेत, त्याबद्दल कृषी विभागाचे आणि सर्व आयोजकांचे अभिनंदन करुन त्या म्हणाल्या, आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी महाराष्ट्र हे कृषी नवकल्पांचे केंद्र बनेल, असा विश्वास श्रीमती पवार यांनी व्यक्त केला.

डॉ. लवांडे म्हणाले, कृषी क्षेत्रातील अडीअडचणी नाविन्यपूर्ण कल्पनेच्या माध्यमातून सोडविण्याच्यादृष्टीने सन २०२५ पासून ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन’ चे आयोजन करण्यात येत आहे. पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी ‘आयमॅट’ संस्थेच्यावतीने करण्यात आली. शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश, हॅकेथॉनमध्ये कृषी विद्यापीठांतील विद्यार्थ्यांचा नवकल्पांना समावेश, विद्यापीठामध्ये इन्क्युबेशन केंद्र उभारणी आदी विषयांच्या अनुषंगाने श्री. लवांडे यांनी सूचना केल्या.

डुडी म्हणाले, नवनवीन तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना उपयोग व्हावा, त्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या उद्देशाने गतवर्षीपासून ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन’ चे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या पुणे ॲग्री हॅकॅथॉनमध्ये १६ नाविन्यपूर्ण उत्पादनाची निवड करण्यात आली असून या सर्व उत्पादनाची तपासणी करण्यासाठी विद्यापीठ आणि कृषी विभागामार्फत करण्यात आली. यशस्वी उत्पादन शेतापर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे.

पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६ करिता गतवर्षीच्या तुलनेत अडीचपट अर्ज प्राप्त आहेत. यावरुन या स्पर्धला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे. अर्जाची तज्ज्ञामार्फत तपासणी करुन १५० उत्पादनाची निवड करण्यात आली आहे, त्यापैकी जवळपास १२३ स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये सहभागी उत्पादकांना पारितोषिके देण्यात येणार असून त्यांना सहकार्य करण्यात येणार आहे.

यावर्षीच्या स्पर्धेत मृदा आरोग्य आणि व्यवस्थापन, स्मार्ट जल व्यवस्थापन आणि ऑटोमेशन, शेती यांत्रिकीकरण (एआय आणि रोबोटिक्स), कृषी प्रक्रिया आणि मूल्य साखळी, अक्षय ऊर्जा आणि कृषी-कचरा व्यवस्थापन, पीक संरक्षण आणि कीड व्यवस्थापन, हवामान-अनुकूल आणि डिजिटल शेती, प्रभावी कृषी प्रशासनासाठी एआय, तंत्रज्ञान आधारित हस्तक्षेप प्रभावी आपत्ती व्यवस्थापन, पीक नुकसानीचे मूल्यांकन आणि भाकितासाठी एआय, तंत्रज्ञान, साधने या ९ विषयाशी निगडित आहे. या हॅकेथॉनचा कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी, शेतकरी, नागरिक, लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. डुडी यांनी केले आहे.

हॅकॅथॉनच्या उद्धाटनानंतर मान्यवरांनी स्टॉलला भेट देवून उत्पादन,संशोधनाची माहिती घेतली व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय सावंत, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे, आत्मा प्रकल्प संचालक सूरज मडके, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅड ऍग्रीकल्चरचे महासंचालक, प्रशांत गिरबाने, बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स कमिटी सदस्य चेतन देदिया, बँक ऑफ महाराष्ट्रच्या उप विभागीय व्यवस्थापक वर्षा थूल, कृषी महाविद्यालय सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष भालेकर, विद्यार्थी, स्टॉर्टअप, संशोधक, शेतकरी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×