आखाती देशातून कच्चे तेल खरेदी-विक्रीत दरमहा ५ ते १० टक्के परताव्याचे आमिष; दहा जणांकडून घेतले ४ कोटींहून अधिक
marathinews24.com
पुणे – आखाती देशात कच्चे तेल व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून दहा जणांची २ कोटी ७४ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी गोहर उल इमान अंगोलकर, फराहदिबा अंगोलकर (दोघे रा. बेळगाव, कर्नाटक), साजिद हनीफ नावडेकर, शाहीद हनीफ नावडेकर (दोघे रा. पनवेल रायगड) यांच्याविरुद्ध फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका व्यावसायिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात ४ दिवस आंदोलनाला बंदी – सविस्तर बातमी
आरोपींनी तक्रारदार व्यावसायिकाला आखाती देशातून कच्चे तेल खरेदी करुन ते भारतीय उपखंड, आफ्रिका, युरोपात विक्री केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखविले होते. या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दरमहा पाच ते दहा टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर व्यावसायिकासह नऊ जणांनी आरोपींकडे गुंतवणुकीसाठी ४ कोटी नऊ लाख ९४ हजार रुपये दिले. आरोपीकडे पैसे गुंतविल्यानंतर परताव्यापोटी १ कोटी ३५ लाख रुपये दिल्याचे भासविले. वर्षभरात गुंतवणूक केलेली रक्कम परत करतो, असे आरोपींनी त्यांना सांगितले. उर्वरित दोन कोटी ७४ लाख ९४ हजार रुपये परत केले नाहीत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस तपास करत आहेत.


























