तब्बल २५ लाखांच्या दागिन्यावर मोलकणीचा डल्ला
marathinews24.com
पुणे – घरकाम करणार्या मोलकरणीने तब्बल २५ लाख रूपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना बाणेरमधील सुप्रीम अॅमडोर पॅनक्लब रोड परिसरात घडली आहे. कपाटामध्ये आढळून आलेल्या नकली नखावरून मोलकरणीची चोरी उघडकीस आली आहे. ही घटना २७ फेबु्रवारी ते २७ एप्रिल कालावधीत घडली आहे. याप्रकरणी स्नेहल गणेश फाळके हिच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०५(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विपुल कुमार गर्ग (वय ५४) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
बारामतीतील अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी आरोपीना अटक करा डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्ग कुटूंबिय बाणेर परिसरातील सुप्रीम अॅमडोर पॅनक्लब रस्ता परिसरातील इमारतीत राहायला आहेत. मागील काही महिन्यांपासून त्यांच्याकडे स्नेहल फाळके घरकाम करीत होती. २७ एप्रिलला गर्ग दाम्पत्य लखनौमध्ये कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आवरत होते. त्यांच्या पत्नीने कपाटात ठेवलेले दागिने तपासले असता, तिला मौल्यवान दागिने असलेली पिशवी गायब असल्याची दिसून आली. घराच्या प्रत्येक कोपर्यात पाहणी केल्यानंतरही त्यांना दागिने मिळून आले नाहीत. १७ फेब्रुवारीपासून कपाट उघडले गेले नव्हते. हे कपाट डिजिटल लॉकने सुरक्षित होते, जे फक्त पती-पत्नीच उघडू शकत होते. घरातील सफाई महिला स्नेहल फाळके हिला कधीकधी कपाटात प्रवेश दिला जात होता.
दागिन्यांची झडती घेतली जात असताना गर्ग दाम्पत्याला कपाटात खोटा नख आढळून आला. दरम्यान, काही दिवसांपुर्वी मोलकरीण स्नेहलनेही असेच नख बनविल्याचे गर्ग यांना दिसून आले होते. या आधारावर गर्ग यांनी स्नेहलवर संशय व्यक्त केला. तिच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तिचे दोन्ही मोबाइल बंद होते. जोडप्याला लखनौला जायचे असल्याने त्यांनी ताबडतोब पोलिसांकडे तक्रार दाखल केली नाही. मात्र, लखनौहून परतल्यानंतरही दागिने सापडले नाहीत. त्यामुळे त्यांनी ४ मेला तक्रार दाखल केली. चोरीला गेलेल्या दागिन्यांमध्ये ६० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या (५ लाख रुपये), हिर्यांच्या बांगड्या (५ लाख रुपये), हिर्याच्या अंगठ्या (३.४० लाख रुपये), कानातल्या ६ जोड्या (३.५० लाख रुपये), चार सोनसाखळ्या (५.९० लाख रुपये), मंगळसूत्र (२.५ लाख रुपये), अंगठी (९० हजार रुपये) आणि एक पेंडेंट (६० हजार रुपये) यांचा समावेश आहे. ३०७ ग्रॅम वजनाच्या दागिन्यांची किंमत २५ लाख ८० हजार रुपये आहे. प्रकरणाचा तपास तपास अधिकारी अविनाश कराड करीत आहेत.