पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दणका
marathinews24.com
पुणे – नागरिकांमध्ये दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सराइताला वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.
मयूर रंगनाथ आरडे (वय २४, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. आरडे याच्याविरुद्ध बेकायदा शस्त्र बाळगणे, दहशत माजविणे, दरोडा घालणे, खुनाचा प्रयत्न करणे, तोडफोड करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
पुण्यात सराईतांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त – सविस्तर बातमी
आरडे हा २०१९ पासून तो गंभीर गुन्हे करत आहे. त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. कारवाई करुन त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती. आरडे खूनशी असल्याने त्याच्याविरुद्ध नागरिक तक्रार देण्यास घाबरत होते. त्याच्याविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई करण्याचा प्रस्ताव सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी तयार केला होता. या प्रस्तावाला पोलीस आयुक्तांनी नुकतीच मंजूर दिली. २४ एप्रिल रोजी त्याला तळजाई वसाहत भागातून ताब्यात घेण्यात आले. त्याला वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक राहुल गौड, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण, सहायक निरीक्षक सागर पाटील, सहायक फौजदार बापू खुटवड, भाऊसाहेब आहेर, विनायक एडके, किरण कांबळे, गोरख ढगे, महेश मंडलिक, सागर सुतकर, बजरंग पवार, अमाेल पवार यांनी ही कारवाई केली.