गतवर्षीच्या तुलनेत गंभीर गुन्ह्याचे प्रमाण घटले
marahinews24.com
पुणे – शहरात गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी गंभीर गुन्ह्यांचा आलेख कमी झाला आहे. विशेषतः खून, खूनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात घट झाली आहे. पोलीस दलाच्या विविध पथकांच्या कामगिरीमुळे गुन्हेगारीचे प्रमाणही घटले आहे. वाहतूक विभाग, गुन्हे शाखा, विशेष शाखेसह स्थानिक पोलीस ठाण्याच्या अमलदारापासून वरिष्ठ अधिकार्यांनी आपआपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. पुणे पोलीस दल पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध असल्याचा पुर्नउच्चार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे.
तरुणाला मारहाण करीत दुचाकी चोरणार्याला अटक – सविस्तर बातमी
पोलीस आयुक्तालयात आयोजित वार्षिंक गुन्हेगारीचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी त्यांनी विविध गुन्ह्यातील आकडेवारी सादर करून माहिती दिली. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, अपर आयुक्त संजय पाटील, अपर आयुक्त मनोज पाटील, अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त कृषीकेश रावले, उपायुक्त मिलींद मोहिते उपायुक्त संभाजी कदम, उपायुक्त हिम्मत जाधव, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, उपायुक्त विवेक मासाळ, उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, उपायुक्त सोमय मुंडे, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, यांच्यासह विविध पोलीस अधिकारी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पोलीस ठाणे स्तरावर अधिकार्यांसह कर्मचार्यांनी कायदा सुव्यवस्थेचा अनुषंगाने काम केले. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत २०२५ मध्ये खूनासारख्या घटना १५ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. तसेच खूनाचा प्रयत्नाचे प्रमाण १४ टक्क्यांहून कमी झाले आहे. शस्त्राने दुखापतीच्या घटनांमध्येही घट झाली आहे. तसेच दरोडा आणि चोरीच्या घटनांचेही प्रमाण घटले आहे. यावर्षी २४२ दरोड्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना जास्त घडल्या. त्यासंदर्भात आम्ही बारकाईन काम करीत आहेत. दरम्यान, महिलांवरील अत्याचार आणि विनयभंगसारखे गुन्हेही तुलनेत कमी घडले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत इतर घटना तब्बल २५ टक्क्यांनी घटल्या असून, त्यासाठी अमलदार अधिकार्यांनी मेहनत घेतल्याचे त्यांनी सांगितले.
वाहन चोरी १८ टक्क्यांनी घटली
शहरातील विविध भागातून वाहने चोरून नेण्याच्या घटनांमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. दरम्यान, वाहन चोरी रोखण्यासाठी सर्वच पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेकडून पेट्रोलिंगसह, शोध मोहिमेला प्राधान्य दिले होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत २०२५ मध्ये वाहन चोरी तब्बल १८ टक्क्यांहून अधिक प्रमाणात घटली असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. यंदाच्यावर्षी १ हजार ५७२ वाहने चोरून नेली आहेत.
१२ कोटी ७१ लाखांचा मुद्देमाल जप्त
प्रॉपर्टी गुन्ह्यातील तब्बल १२ कोटी ७१ लाखांचा मुद्देमाल परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास चार कोटींची रक्कम जास्त मिळवून दिल्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. तसेच फसवणूकीच्या गुन्ह्यातील ६ कोटी ६४ लाखांची रक्कम माघारी मिळवून देण्यात आली आहे.
कुख्यात गुन्हेगारी टोळ्याविरूद्ध ठोस कारवाई
नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणार्या कुख्यात गुंड नीलेश घायवळ, गजा मारणे, बंडू आंदेकर, टिपू पठाण यांच्यासह विविध टोळ्यांना मोक्काचा दणका दिला आहे. भाईगिरीसह दादागिरी करणार्यांविरूद्ध एमपीडीएनुसार कारवाई करणे, टोळ्यांचे आर्थिंक स्त्रोत बंद करणे, बेकायदेशिर बांधकाम पाडण्यासाठी प्राधान्य देणे, कोम्ंिबग ऑपरेशनद्वारे गुन्हेगारी मोडीत काढल्यामुळे नागरिकांमध्ये शांतता प्रस्थापित झाली आहे. आतापर्यंत आंदेकर टोळीविरूद्ध १२ गुन्हे दाखल केले. घायवळविरूद्ध १२ केसेस, गजा मारणेविरूद्ध २८, टिपू पठाणविरूद्ध ४ गुन्हे दाखल केले आहेत. संबंधित टोळ्यातील इतर आरोपींना अटक केले.
२०२५ मधील इतर महत्वाच्या कारवाई
अग्निशस्त्र बाळगणे ८ गुन्हे, आर्मअॅक्ट रिकव्हरी १३३, गुन्हेगारीसाठी घातक शस्त्रांचा वापर २९५ गुन्हे, आर्मअॅक्ट ४(२५)-३५९ जप्त, वाहन तोडफोड- ६२ गुन्हे, एमपीडीए कारवाई- ११०, मोक्का-५२, मोक्कातील आरोपी-३८० अटक केले आहेत. त्यासोबतच अमली विरोधी पथकाने तब्बल २१५ गुन्ह्यातील ३१९ जणांना अटक करीत ८ कोटी ६४ लाख ३ हजारांचे ड्रग्ज जप्त केले.
तब्बल १५० आर्म लायसेन्स अर्ज नाकारले
विविध गुन्हे दाखल असतानाही आर्म लायसेन्ससाठी अर्ज केलेल्या १५० जणांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. तर वारसा हक्काने असलेल्या २३ जणांना शस्त्र परवाना हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस खात्याविषयी बदनामीकारण वर्तन केलेल्या ५९ जणांना निलंबित करण्यात आले आहे. तर पोर्शे अपघातप्रकरणी संशयास्पद भूमिका घेतलेल्या दोघा अधिकार्यांना बडतर्फ केले आहे.
झिरो टॉरलन्सला प्राधान्य- पोलीस आयुक्त अमितेश कुमार
कायदा सुव्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी नियोजन करणे, प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत दाखल गुन्ह्यांचा अभ्यास करणे, नाविण्यपुर्ण गुन्ह्याची उकल करण्यासाठी अमलदारांपासून अधिकार्यांपर्यंत प्रशिक्षण देणे, महिला-मुलींच्या तक्रारी प्राधान्याने दाखल करून तपासाला गती देणे, गुन्हेगारीला झिरो टॉरलन्स देण्यास प्राधान्य दिल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.






















